रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर राजकीय रंगत वाढली असून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांना उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे.
त्यामुळे कोकणातील ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. दुसरीकडे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळत आहेत. अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदारांचा कल जाणून घेतला. या अंतर्गत सर्वेक्षणात बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी अनिकेत तटकरे यांच्या नावाला पसंती दिल्याचे समोर आले. त्यामुळे महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महायुतीत मोठी राजकीय तडजोड झाल्याची चर्चा आहे. या चर्चेनुसार शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात येणार असून त्याबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला कोकण विधान परिषद उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीला थेट आव्हान दिले आहे. त्यांनी सांगितले की, महायुतीचे संख्याबळ जास्त असले तरी मतदारांसमोर सक्षम पर्याय म्हणून आपण उभे आहोत. यापूर्वी निवडून आलेल्या प्रतिनिधींनी अपेक्षित विकासकामे केली नसल्याने मतदार बदलाचा विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षाने निवडणूक लढवणे आवश्यक असते. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये याबाबत एकमत झाल्याने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे माने यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडीचा उमेदवार कालपर्यंत निश्चित नव्हता. मात्र मुंबईत झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत “लढाई न देता माघार घेणे योग्य नाही” अशी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर बाळ माने यांच्या नावावर एकमत झाले आणि त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीत बाळ माने आणि मंत्री उदय सामंत यांच्यात झालेली चुरस राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने बाळ माने यांच्या रूपाने विधान परिषदेच्या निवडणुकीत ताकद पणाला लावल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महायुतीचे पारडे स्पष्टपणे जड दिसते. उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेनेकडे ३३४, भाजपकडे २६४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६५ मतदार आहेत. एकूण तिन्ही जिल्ह्याची मतदारसंख्या १०१८ इतकी आहे.
या पार्श्वभूमीवर महायुती विजयाची दावेदार मानली जात असली तरी महाविकास आघाडीच्या एन्ट्रीमुळे निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही. विरोधकांनी दिलेल्या आव्हानामुळे आता प्रचार, राजकीय समीकरणे आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यांची कसोटी लागणार आहे. कोकण विधान परिषद निवडणूक सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र महाविकास आघाडीने बाळ माने यांना मैदानात उतरवत थेट सामना उभा केला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक केवळ एका जागेची न राहता महायुती आणि महाविकास आघाडीच्या ताकदीची चाचणी ठरणार आहे.कोकणातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून आगामी काळात प्रचाराच्या रणधुमाळीत आणखी अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
