रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीतच मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात जागेच्या दावेदारीवरून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असून उमेदवारीवरून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची सदस्यसंख्या तुलनेने अधिक असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या जागेवर जोरदार दावा केला जात आहे.

कोकणातील या प्रतिष्ठेच्या जागेसाठी खासदार सुनील तटकरे आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांनीही या जागेवर दावा कायम ठेवला आहे. शिवसेना (शिंदे गट)कडून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि राजन साळवी यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उमेदवारीचा पेच अधिकच वाढला आहे. महाविकास आघाडीत मात्र अद्याप ठोस हालचाली दिसत नसल्या तरी ही जागा शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपने सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, अखेरीस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वाट्याला गेल्यास भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना युतीधर्म पाळत पाठिंबा द्यावा लागणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे रायगडमधील राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष या निवडणुकीमुळे अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन्ही नेते आपल्या मुलांसाठी या जागेवर आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

१०१८ मतदार ठरवणार भावी आमदार

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण १०१८ मतदार सदस्य असून त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या सदस्यांचा समावेश आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हे सदस्य विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे एकूण १९७ सदस्य असून नगरपालिका व नगर पंचायतींचे ८२१ सदस्य आहेत. त्यात ५१५ पुरुष तर ५०३ महिला सदस्यांचा समावेश आहे.

मतदारसंघनिहाय सदस्यसंख्या

पनवेल – १२३ सदस्य

कर्जत – ११३ सदस्य

सावंतवाडी – ८५ सदस्य

कणकवली – ७९ सदस्य

रत्नागिरी – ७५ सदस्य

चिपळूण – ६८ सदस्य

कुडाळ – ५९ सदस्य

अलिबाग – ५७ सदस्य

राजापूर – ५५ सदस्य

महाड – ५० सदस्य

रोहा – ४८ सदस्य

दापोली – ४८ सदस्य

श्रीवर्धन – ४७ सदस्य

माणगाव – ४६ सदस्य

पेण – ३४ सदस्य

खेड – ३१ सदस्य

या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य आता कोकणातील भावी आमदाराचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू

विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १८ मे २०२६ पासून ते २५ जून २०२६ पर्यंत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेवर फलक, बॅनर लावून विद्रूपीकरण केल्यास महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

२५ मे २०२६ – अधिसूचना जारी

१ जून २०२६ – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

२ जून २०२६ – अर्ज छाननी

४ जून २०२६ – अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

१८ जून २०२६ – मतदान

२२ जून २०२६ – मतमोजणी

२५ जून २०२६ – निवडणूक प्रक्रिया पूर्ण

कोकणातील या विधान परिषद निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय गणिते पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.