राहाता:शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी पाणी घेण्यास गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद येथे आज, बुधवारी घडली. या घटनेमुळे बाहदराबाद गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील दोन कर्त्या, मेहनती शेतकऱ्यांचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपक रामचंद्र पाचोरे (वय ३३) आणि प्रशांत गीतराम पाचोरे (वय ३४ दोघेही रा. बाहदराबाद) असे मृत तरूणांची नावे आहे. दोघेही शेती व्यवसाय करीत असल्याने अपापल्या कुटुंबाचा आधार होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दोघेही शेतातील पिकांवर औषध फवारणीसाठी शेततळ्यातून पाणी काढण्यास गेले होते. शेततळ्यावर गेल्यानंतर दीपक पाचोरे यांचा अचानक तोल गेला आणि ते पाण्यात पडल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात प्रशांत पाचोरे यांनी शेततळ्यात उडी घेतली. दुर्दैवाने दोघांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, बराच वेळ उलटूनही दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. प्रशांत पाचोरे यांच्या पत्नीने शोधासाठी शेताचा रस्ता धरला. शेततळ्याजवळ पोहोचल्यावर त्यांना फवारणीचा पंप आणि इतर साहित्य तळ्यावर पडलेले दिसले. ही बाब पाहताच त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी तातडीने आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलावले. नागरिकांनी शेततळ्यात शोध सुरू केला. काही वेळाने प्रशांत पाचोरे हे बेशुद्धावस्थेत पाण्यात आढळले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र दीपक पाचोरे यांचा काहीच शोध लागत नव्हता. त.यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. शेततळ्याची खोली आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने, पाणी कमी करण्यासाठी तळ्याचा बांध फोडण्यात आला.
नंतर दीपक पाचोरे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.घटनास्थळी कुटुंबीयांचा व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मृत प्रशांत पाचोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील तर दीपक पाचोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. दोघांवर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेततळ्याभोवती सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
या घटनेने शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतीसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत म्हणून शेततळ्यांची संख्या वाढली, तरी अनेक शेततळ्यांना कठडे, संरक्षक जाळी, इशारा फलक किंवा बचावासाठी आवश्यक साधने व इतर सूरक्षा व्यवस्था नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत.
