राहाता: कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे बोगस खताचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाताच पथकाने धाड टाकत संशयित खताचा साठा जप्त केला. यासंदर्भात देर्डे कोऱ्हाळे येथील कृषी सेवा केंद्र चालक व इतर तीन कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी दिली.
दरम्यान जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे व कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे बोगस खताचा साठा असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्याने याठिकाणी पथकाने तातडीने धाड टाकत संशयित खताचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तपासणीनंतर अहवालात छापा टाकलेले खत बनावट असल्याचे समजले. त्यानंतर गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून देर्डे कोऱ्हाळे येथील कृषी सेवा केंद्र चालक व इतर तीन कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या महिनाभरातील सलग तिसऱ्या कारवायांमुळे बोगस खत विक्रेत्यांमध्ये मोठीच खळबळ उडाली आहे. या तीनही कारवयांमध्ये एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ५१ मेट्रिक टन संशयित खतसाठा जप्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस खत विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांची बोगस खत विक्री करून फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. महिनाभराच्या कालावधीत तीन ठिकाणी कारवाई करत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांसह संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण तिन्ही कारवायातील बोगस खत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कंपन्यांची नावे जाहीर केली आहेत.
खरेदीची पावती घ्यावी
शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के देयक विक्रेत्यांकडून घ्यावे. खरेदीत कुठे काही शंका आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा. – मनोज सोनवणे, कोपरगाव, तालुका कृषी अधिकारी.

