राहाता: कोळगावथडी (ता.कोपरगाव) येथील गोदावरी नदीपात्रातून, वनविभागाच्या राखीव वनामधून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या फिरत्या पथकावर वाळू माफियांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात वनविभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. याबाबत ३५ ते ४० जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना आज, शनिवारी कोपरगाव येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दिपक चंद्रभान मोरे, (वय ३२) आकाश नंदकिशोर निंबाळकर (वय २९), देवराम वाल्मीक कोळपे, (वय ३९), वसिम मोहम्मद शेख, (वय ३०), कृष्णा जनार्दन काळे, (वय ३५, सर्व रा. कोळगाव थडी, कोपरगाव), प्रतीक मोहन कोळपे (वय २४), जालींदर भागवत पांढरे, वय ३८), राहुल रविंद्र निकाळे (वय २८, सर्व रा. कोळपेवाडी, कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सचिन लहानु शिंदे (वय ४७, वनपाल) व सुरेश नवनाथ भोसले (वय ३७, वनरक्षक, दोघेही रा. अहिल्यानगर) हे दोन कर्मचारी जखमी झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुळकर, वनपाल सचिन शिंदे, वनरक्षक सुरेश भोसले, अर्जुन खेडकर, पोलीस शिपाई भगीरथ पंचमुख व चालक अक्षय ससे यांचे पथक काल, शुक्रवारी रात्री ११:३० वा. कोळगावथडी येथील वनक्षेत्रात कारवाईसाठी गेले होते. गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूची साठवणूक व वाहतूक करणारा ट्रॅक्टर पथकाने पकडल्याची माहिती आरोपींनी कळताच ३५ ते ४० जणांनी वन कर्मचाऱ्यांचा रस्ता अडवत लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि कोयत्यांनी शासकीय वाहनावर हल्ला करून तोडफोड केली तसेच कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला.आरोपींनी शासकीय वाहनाची तोडफोड करत जप्त केलेला ट्रॅक्टर आणि त्यातील १ ब्रास वाळू जबरदस्तीने पळवून नेली.
याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १४ आरोपींसह ३५ ते ४० अनोळखी इसमांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, भारतीय वन अधिनियम आणि महाराष्ट्र गौण खनिज कायद्यातील विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
