नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात सोमवारी युनिट क्रमांक १० मधील राख पाडण्याचे काम सुरू असतांना बाॅयलरमधील वाफ अंगावर येऊन आठ अधिकारी- कर्मचारी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील ६६० मेगावॅटच्या संच क्रमांक १० मधून गरम राख सदृष्य पदार्थ काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक येथील बायलरच्या छिद्रातून गरम राख अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगावर उडाली. त्यामुळे ते भाजल्याने आरडाओरडा करू लागले. हा प्रकार पाहून परिसरात खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत अधिकारी-कर्मचारी मिळून ८ जणांना कोराडी रोडवरील मानकापूर परिसरातील मॅक्स या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या विषयावर महानिर्मिती प्रशासनाकडून महत्वाची माहिती लोकसत्ताला दिली गेली आहे.

वारंवार घटना घडण्याचे कारण काय?

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात यापूर्वी ओझोन वायू गळतीमुळेही काही कामगार जखमी झाले होते. त्यापूर्वीही अधूनमधून येथे विविध घटनांमध्ये कामगार जखमी झाले होते. आता गरम राख अंगावर पडून काही जण जखमी झाले आहेत. त्यामुळे येथे वारंवार घटना घडण्याचे कारण काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या घटनांमुळे येथे कामगार व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक काळजी घेतली जाते का, हा प्रश्नही विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांकडून विचारला जात आहे.

जखमींची नावे काय?

जखमींमध्ये सचिन भागेवार, विवेक पाटील, तेजस सोनवणे, ए.के. काझी, निखिल जायतगुडे, कमलेश बारमटे, गुलसिंग टिकाम व विलास बन्सोड यांचा समावेश आहे. त्यापैकी ४ जण महानिर्मितीचे अधिकारी- कर्मचारी व ४ जण कंत्राटी कामगार आहेत. सर्व जखमींना मॅक्स हेल्थकेअर हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल केले गेले. प्राथमिक उपचारानंतर सचिन भागेवार, तेजस सोनवणे व विलास बन्सोड यांना सुटी देण्यात आली आहे, तर ए. के. काझी यांना आज सायंकाळपर्यंत सुटी देण्यात येणार आहे. उर्वरित ४ गंभीर जखमींवर उपचार सुरू आहे.

महानिर्मितीचे म्हणणे काय?

सोमवारी (१३ एप्रिल) सकाळी १०.२० वाजता कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातील संच क्र. १० बंद असताना, १३ मीटर उंचीवरील मजल्यावर राख सदृष्य पदर्थ (क्लिंकर) पाडत असताना बॉयलरमधील पिप होलमधून वाफ बाहेर आल्याने ८ जण जखमी झाले. सगळ्यांना मॅक्स हेल्थकेअर हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल केले गेले. त्यापैकी चौघांना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी झाली तर चौघांवर उपचार सुरू आहे. घटनेनंतर तात्काळ वैद्यकीय मदत देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. प्रथमदर्शनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले नाही. महानिर्मितीतर्फे सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध केला गेला आहे. हा खर्च कंपनी उचलणार आहे.