वाई: महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे हाताचा अंगठा आहेत.उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणजे करंगळी असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी साताऱ्यात करत नवीन वादाला तोंड फोडले आहे. महाविकास आघाडीवर खालच्या भाषेत टीका केली आहे.शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या उत्सवानिमित्त साताऱ्यातील शिवतीर्थ पोवई नाक्यावर आयोजित कार्यक्रमा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महेश शिंदे पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ विषयी त्यांना विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले,महाविकास आघाडीची वज्रमुठ नाही तर वज्रमूत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे हाताचा अंगठा आहेत. करंगळी हे बोट कशासाठी वापरतात हे सर्वांना ठाऊक आहे. ती करंगळी म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आहेत.शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे म्हणजे हाताचे मधले बोट आहे. तिसरे बोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असून चौथे बोट हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. पवारांनी कोणाला कसा अंगठा दाखवला हे आजपर्यंत कोणाला कळाले नाही.




राऊतांची वक्तव्ये म्हणजे खंडीच्या वरणात लघुशंका केल्याचा प्रकार आहे. तिसऱ्या व चौथ्या बोटाने मधल्या बोटाला इतके चेपवले आहे की बोलायची सोय नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ नसून ती वज्रमूत आहे. जनता या महाविकास आघाडीला स्वीकारेल असे अजिबात वाटत नाही. आमदार महेश शिंदे यांच्या या टीकेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे.