अलिबाग – मुरूड तालुक्यातील कोर्लई जिल्हा परीषद मतदार संघातील भाजपच्या पराभूत उमेदवार अॅड. मनस्वी मोहिते यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. मतमोजणी प्रक्रिया ही संशयास्पद , पक्षपाती आणि शिवसेना उमेदवाराला विजयी करण्यासाठी स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या दबावाखाली करण्यात आल्याचा गंभीर आरोप अॅड. मनस्वी मोहिते यांनी केला आहे. याप्रकरणी मोहिते यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून निवडणूक निर्णय अधिकारयांसह त्यांच्या सहायकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यासदंर्भात उच्च न्यायालयात निवडणूक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परीषद निवडणूक नुकतीच पार पडली. मुरूड तालुक्यातील कोर्लई जिल्हा परीषद मतदार संघाची मतमोजणी मुरूड येथे पार पडली. कोर्लई मतदार संघातील तिरंगी लढतीत अॅड. मनस्वी मोहिते यांचा ६३४ मतांनी पराभव झाला. या मतमोजणी प्रक्रियेलाच मोहिते यांनी आक्षेप घेतला आहे. मतमोजणी करत असताना ईव्हीएम मशीन मधून आलेली आकडेवारी नोंदवण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना, नियम यांची जाणीवपूर्वक पायमल्ली करण्यात आली असल्याचे मोहिते यांनी म्हटले आहे.
काय आहेत आक्षेप
प्रत्येक इव्हीएममध्ये नोंदवली गेलेली एकूण मते नमूद करून त्या मतांची विभागणी उमेदवारांना पडलेल्या मतानुसार केली जाते. नमुना फॉर्मवर यांची नोंद करून आकडेवारीचा मेळ जुळतो की नाही याची खात्री करून इव्हीएम पर्यवेक्षक उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधींच्या त्यावर स्वाक्षरया घेतल्या जातात. मात्र कोर्लई गटात एकूण 39 ईव्हीएम मशीन मधील मतांची नोंदणी केलेल्या फॉर्मवर प्रतिनिधींची स्वाक्षरी घेवून खात्री करण्यात आली नाही असे मोहिते यांचे म्हणणे आहे.
मतमोजणीच्या वेळी अफरातफरीची शंका आल्याने आपण फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता परंतु कोणतेही सबळ कारण न देता तो तात्काळ फेटाळण्यात आल्याचा दावा मोहिते यांनी केला आहे. एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनवरील आकडेवारी आणि एकूण झालेले मतदान यांच्यात तफावत दिसून येते ही तफावत आकडेजोड करून पर्यवेक्षकांनी मेळ बसवण्याचा प्रयत्न केला परंतु यावर देखील मतमोजणी प्रति नि धींची स्वाक्षरी घेतलेली नाही, असे मोहिते यांचे म्हणणे आहे. मतदान यंत्रावरील उपलब्ध आकडेवारीत फेरबदल करण्याच्या उद्देशाने जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची एकत्रित आकडेवारी फॉर्मवर भरताना विहीत नमुन्यात छेडछाड करून नव्याने तयार केलेल्या फॉर्मवर भरण्यात आली. ही बाब गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व सहायक यांचयावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोहिते यांनी राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात केली आहे.
आ. महेंद्र दळवी यांचा दबाव ?
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवताना अॅड. मनस्वी मोहिते यांनी गंभीर आरोप केला आहे. मतमोजणी प्रक्रिया ही अत्यंत संशयास्पद , पक्षपाती व शिवसेनेच्या उमेदवार ज्योती नागावकर यांना विजयी करण्यासाठीच आमदार महेंद्र दळवी यांच्या दबावात पार पाडल्याचे मोहिते यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. रायगडचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपण याबाबत स्वतंत्र अर्ज दिला आहे. अशा परीसथितीत सर्व संबंधित अधिकारयांचे निलंबन करून कठोर शासन व्हावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे
