नांदेड – नवीन नांदेड भागातील तिरुमला ऑईल मिलला आग लागल्याची घटना रविवार (दि.२) डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेत कोत्तावार कुटुंबातील तिघे बाप-लेक तर बंडेवार परिवारातील पिता-पुत्र गंभीररित्या भाजले होते. या घटनेत गंभीर भाजलेल्या हर्षद कोत्तावार व विनोद कोत्तावार दोघा भावांचा हैदराबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना एक दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला.
नवीन नांदेड भागातील एमआयडीसीमधील तिरुमला ऑईल मिलला लागलेल्या आगीच्या घटनेत मिलमध्ये भागीदार असलेल्या भास्कर प्रल्हाद कोत्तावार, हर्षद भास्कर कोत्तावार, विनोद भास्कर कोत्तावार, सुधाकर सूर्यकांत बंडेवार, सुमित सूर्यकांत बंडेवार हे गंभीररित्या भाजल्या गेले होते. त्यांना शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी हर्षद कोत्तावार, विनोद कोत्तावार, सुमित बंडेवार या तिघांची प्रकृती खालवत चालल्याने त्यांना हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.
हैदराबाद येथे उपचारादरम्यान गुरुवार (दि.५) रोजी हर्षद कोत्तावार यांचा मृत्यू झाला. त्यांची उत्तरीय तपासणी करुन शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर शुक्रवारी (दि.६) रोजी दुपारी त्यांचा सख्खा भाऊ असलेल्या विनोद कोत्तावार यांचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर उत्तरीय तपासणीनंतर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोन सख्या भावाच्या निधनाची बातमी नांदेडमध्ये धडकल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.