सांगली : महाराष्ट्रासाठी वरदायिनी असलेल्या कोयना धरणासह पश्चिम घाटातील १२ पैकी आठ धरणे काठोकाठ भरली आहेत. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले कोयना धरण बुधवारी सकाळी शंभर टक्के भरल्याने पुढील वर्षभर वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोयना जेमतेम ८५ टक्के भरले होते. राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये कोयना उर्फ शिवसागर जलाशयाचा समावेश होतो. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणावर सातारा, सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील सिंचन योजना तसेच कराड, सांगली, मिरज शहरासह नदीकाठच्या शेकडो गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. परंतु महाराष्ट्रासाठी जलविद्युत निर्मितीचा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून कोयनेचे महत्त्व मोठे आहे. बुधवारी सकाळी हे धरण शंभर टक्के भरत धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला. हेही वाचा : ST Employee Strike : मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; सरकारकडून पगारात साडे सहा हजारांची वाढ कोयना धरणासह पश्चिम घाटातील १२ पैकी आठ धरणात शंभर टक्के जलसाठा झाला आहे. दूधगंगा ९३ टक्के, धोम, चांदोली ९७ टक्के आणि राधानगरी धरणात ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. कृष्णा खोऱ्यातील शंभर टक्के पाणीसाठा झालेली धरणे- कोयना, कण्हेर, तुळशी, कासारी, पाटगांव, धोम-बलकवडी, उरमोडी आणि तारळी या धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी गेल्या दोन महिन्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुबलक पावसाने पाण्याची मोठी आवक होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयनेतून बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सहा वक्र दरवाजातून ९ हजार ५४६ तर पायथा विद्युत गृहातून २१०० असा ११ हजार ६४६ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तर चांदोलीतून सायंकाळी पाच वाजल्यापासून सांडव्यावरील वक्र दरवाजातून १५५४ आणि विद्युतगृहातून १४०० तसा २९५४ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीतील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. हेही वाचा : मालवण येथे ९ एकर जमिनीवर शिवपुतळा, शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रस्ताव अलमट्टीमध्ये १२२.२३ टीएमसी पाणीसाठा पश्चिम घाटातील अन्य धरणांतून होत असलेला विसर्ग क्युसेकमध्ये असा आहे, कण्हेर ४६६, धोम ४०४, दूधगंगा ५०००, राधानगरी २९२८, तुळशी ५००, कासारी ८००, पाटगांव १७६५, धोम-बलकवडी १४७४, उरमोेडी ४५० व तारळी ५७९ क्युसेक तर कर्नाटकातील अलमट्टी धरणात बुधवारी सकाळी १२२.२३ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात प्रती सेकंद ३१ हजार २९६ आवक असून २० हजार क्युसेकचा विसर्ग आहेे.