कराड : कोयना धरण पाणलोटात दमदार पाऊस आणि धरणातील जलआवक ‘जैसे थे’ असून, पश्चिम घाटक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळणे सुरूच आहे. वीज, सिंचन, पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला कोयना शिवसागराचा जलसाठा ३८.३३ अब्ज घनफूट (३६.४२ टक्के) झाला आहे. तर, सातारा जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांचा जलसाठा ४० टक्क्यांच्या घरात पोहचला आहे.

कोयना धरणाचा अपवादवगळता अन्य जलाशय क्षेत्रात ढगाळ वातावरणात तुरळक पाऊस कोसळत आहे. अशीच स्थिती अन्य विभागांतही दिसत आहे. दरम्यान, छोटी धरणे, तलाव, बंधारे भरून वाहत आहेत. तर, मोठ्या धरणांचा जलसाठा समाधानकारक स्थितीत राहिला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, धोम- बलकवडी, उरमोडी आणि तारळी या प्रमुख धरणांची साठवणक्षमता १४८.७४ अब्ज घनफूट असून, आजमितीला या धरणांमध्ये ५९.०८ अब्ज घनफूट (३९.७२ टक्के) जलसाठा झाला आहे.

कोयना शिवसागरात सोमवारी (दि. २३) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत १.४३ अब्ज घनफूट पाण्याची आवक होऊन सकल जलसाठा ३८.३३ अब्ज घनफूट (३६.४२ टक्के) झाला आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद १६,५५३ घनफूट (क्युसेक) पाण्याची आवक होत आहे. कोयना पाणलोटात दिवसभरात सरासरी ३६.३३ मिमी पाऊस झाला आहे. त्यात कोयनानगरला ४० मिमी (एकूण ९११), नवजाला ३३ मिमी (एकूण ९१२), महाबळेश्वरला ३६ मिमी (एकूण ८७६) पावसाची नोंद राहिली आहे. सोमवारी दिवसभरात पश्चिम घाटात तांदुळवाडी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे सर्वाधिक ४६ मिमी पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातीलच रेवाचीवाडी व पाडळी येथे ४४, सांडवली येथे ४१, भागोजी पाटलाचीवाडी येथे २३ मिमी असा जोरदार पाऊस झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे खरीप पेऱ्याला सुरुवात होण्यासाठी जमिनीतील पाणी आणि अतिरिक्त ओलावा कमी व्हावा म्हणून पावसाची विश्रांती व भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी बळीराजासह सामान्य जनतेचे आभाळाकडे लक्ष लागून राहिले आहे.