कराड: पश्चिम घाटमाथा आणि कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार ते अतिवृष्टीमुळे संपूर्ण संपूर्ण घाट प्रदेशासह कृष्णा, कोयना नद्यांवरकाठी सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, कोयना धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कोयना धरणात तब्बल ८.०३ टीएमसी / अब्ज घनफूट (९३,०२० क्युसेक वेगाने) नव्या पाण्याची आवक झाली असून एकूण धरणसाठा ३३.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. अपेक्षेप्रमाणे कोयनेचा जलसाठा एक तृतीयांश झाला आहे.
हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला धोक्याचा इशारा’रेड अलर्ट’ जारी केला असून महाबळेश्वरमध्ये २४ तासांत ४०० मिमी (१५.७५ इंच) अशा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुलैच्या सुरुवातीला पाणीसाठा कमी असला, तरी सध्याची जलआवक गतवर्षीपेक्षा तिपटीहून अधिक आहे. गेल्या वर्षी ७ जुलै २०२५ रोजी सकाळी आठ वाजता धरणात ६८.३८ टीएमसी म्हणजेच ६४.९७ टक्के साठा होता आणि पाण्याची आवक २३,८७४ क्युसेक होती.
या उलट, आज ७ जुलै २०२६ रोजी सकाळी आठ वाजता धरणाचा एकूण साठा ३५.७० टीएमसी (३३.९२ टक्के) असून, उपयुक्त साठा ३०.५८ टीएमसी झाला आहे. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने धरणाची पातळी सध्या २०८६ फूट ९ इंच आहे, जी गतवर्षी २१२८ फूट १ इंच होती. मात्र, सध्या आवक प्रचंड असल्याने ही तूट वेगाने भरून निघत आहे.
पावसाच्या या रौद्ररूपामुळे महाबळेश्वर येथील वेण्णा लेक जवळील लोखंडी पूल कोसळला असून, केळघर घाटात दरड कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कराड- पाटण आणि कराड-चिपळूण मार्गावर वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. पाटणच्या नव्या बसस्थानकासमोरील गाळे आणि वाई, जांभळी परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये पाणी शिरले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, तर आपत्ती व्यवस्थापनासाठी कराड- पाटण भागात “एनडीआरएफ’चे २८ जवानांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्परतेने पंचनामे व मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
