चिपळूण : कोयना धरणातील पाण्याचा नियोजनबद्ध वापर न झाल्याने जलविद्युत निर्मितीवर परिणाम झाला आहे. नव्या जलवर्षातील पहिल्या तीन महिन्यांत गतवर्षाच्या तुलनेत कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती तब्बल १७६.९२० दशलक्ष युनिटने कमी झाली आहे. दुसरीकडे याच कालावधीत पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून, त्यातील २५.३५ टीएमसी पाण्याचा विनावापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यंदा मे महिन्यात कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जलविद्युत निर्मिती ठप्प झाली होती. पूर्वेकडे सिंचनाचे पाणी बंद करून केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याची वेळ आली. त्यानंतर जून महिना कोरडा गेला. जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला असतानाही गतवर्षाच्या तुलनेत वीजनिर्मितीत मोठी घट झाली आहे.

यंदाच्या जलवर्षातील तीन महिन्यांत पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ७.१६ टीएमसी पाण्याचा वापर झाला असून त्यातून ३४६.६५३ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली. गतवर्षी याच कालावधीत १०.६१ टीएमसी पाण्यावर ४९४.९५० दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा ३.४५ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने १४८.२९७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती घटली.

पूर्वेकडील कोयना पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यंदा पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेल्या १.३१ टीएमसी आणि पूरकाळात सोडलेल्या १.८२ टीएमसी, अशा एकूण ३.१३ टीएमसी पाण्यावर १२.६९५ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली. गतवर्षी पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ८.९६ टीएमसी पाण्यावर ४१.३१८ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा ५.८३ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने पूर्वेकडील वीजनिर्मितीत २८.६२३ दशलक्ष युनिटची घट झाली.

पश्चिमेकडील १४८.२९७ आणि पूर्वेकडील २८.६२३ दशलक्ष युनिटची घट एकत्रित केल्यास यंदाच्या तीन महिन्यांत १७६.९२० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाल्याचे स्पष्ट होते. पाण्याचा अधिक परिणामकारक वापर झाला असता तर वीजनिर्मितीतील ही तूट काही प्रमाणात भरून निघाली असती आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलातही वाढ झाली असती, असा मुद्दा उपस्थित होत आहे.

दरम्यान, धरणाची पाणी साठवण क्षमता संपुष्टात येत असल्याने पुढील काळात पूर्वेकडे सोडले जाणारे पाणी कितपत उपयोगात येणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. उपलब्ध पाण्याचा वीजनिर्मिती, सिंचन आणि पिण्याचे पाणी यासाठी समतोल व परिणामकारक वापर करण्यासाठी दीर्घकालीन जलनियोजनाची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

पश्चिमेकडील घट: १४८.२९७ दशलक्ष युनिट

पूर्वेकडील घट: २८.६२३ दशलक्ष युनिट

एकूण घट: १७६.९२० दशलक्ष युनिट 

पश्चिमेकडील पाणीवापर घट: ३.४५ टीएमसी

पूर्वेकडील पाणीवापर घट: ५.८३ टीएमसी

कोयना धरणातील विद्यमान जलसाठा आणि भविष्यात पडणारा पाऊस याचा अंदाज घेवून धरणाची सुरक्षितता लक्षात घेत पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. तसे केले नाही तर पाण्याचे व्यवस्थापन करणे शक्य होत नाही. धरण पूर्ण भरले आहे त्यामुळे आगामी काळातील पाण्याची टंचाईचा विषय संपला आहे. महेश रासणकर कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन विभाग