कराड : महाड येथील एका कंपनीच्या टँकरमधून परवा सोमवारी (दि. १३) रात्री साडेतीनच्या सुमारास पाटणजवळ कोयना नदीपात्रात औद्योगिक रासायनिक द्रव सोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकाराची दखल घेवून प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगिरी व पाटण नगरपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून पाटण शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तातडीने थांबवला आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे पाटणकरांना कृत्रिम पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, रासायनिक द्रव्य थेट कोयना नदीत ओतण्याच्या कृत्यामुळे लोकांच्या आरोग्यासह पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी संबंधित ट्रक चालक, मालक आणि कारखानदाराविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस याज्ञसेन पाटणकर आणि पाटण नगरपंचायतीने पोलिसांकडे केली आहे.
आंतरराज्यीय चिंतेचा विषय!
तामकडे (ता. पाटण) येथे पाटण नगरपंचायतीचे जलउपसा केंद्र (जॅकवेल) आहे. येथूनच शहराला पाणीपुरवठा होतो. कोयना नदीचे पाणी कराड, सांगलीसह पुढे कर्नाटक राज्यात वाहत असल्याने, हे प्रदूषण केवळ स्थानिक नसून, आंतरराज्य स्तरावरील पर्यावरणीय संकट ठरण्याची भीती आहे.
सखोल तपासाची मागणी
खर्च वाचवण्यासाठी कंपन्यांनी हे रसायन नदीत सोडल्याचा आरोप निवेदनात आहे. पोलिसांनी सदर वाहनाचा जीपीएस डेटा, सीसीटीव्ही फुटेज, पथकर नोंदी आणि कंपनीचे ई-वे बिल जप्त करून चौकशी करावी; तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनकर्ते याज्ञसेन पाटणकर, जगदीश शेंडे, अनिता देवकांत, संजय इंगवले व नगरसेवकांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आल्या आहेत.
चाचणी अहवालाची प्रतीक्षा
या गंभीर प्रदूषणाच्या अनुषंगाने कोयना नदीतील १२ ठिकाणचे पाणी हे चाचणीसाठी घेण्यात आले असून, त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अमोल सातपुते यांनी संबंधितांना याबाबत लेखीपत्र देताना, या प्रकरणात तातडीने कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
