सांगली : कुंडल येथील क्रांती कारखान्याने उसासाठी एफआरपीपेक्षा १३३ रुपये प्रतिटन अधिक देण्याची तयारी दर्शवली आहे. कारखान्याची एफआरपी ३३६७ असताना या हंगामात ऊस उत्पादकांना प्रतिटन ३ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले. दरम्यान, क्रांती, सोनहिरा, दालमिया शुगर या केवळ तीन कारखान्यांनीच दर जाहीर केला असून अन्य कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच राहील, असे महेश खराडे व संदीप राजोबा यांनी सांगितले.

अध्यक्ष श्री. लाड म्हणाले, कारखान्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने उच्चाकी ऊसदर देण्याची परंपरा क्रांतीने जपली आहे. इथला शेतकरी शेत जमिनीची गुणवत्ता टिकवत ऊस शेतीत वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग तसेच आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत असतो. कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडून मार्गदर्शनाबरोबरच बियाणे, औषधे, खते, प्रायोगिक तत्त्वावर निर्माण केलेली अवजारे यांचा पुरवठा करण्यात येतो. कृत्रिम बुद्धिमतेच्या वापराने मागील काही वर्षांपासून कारखाना कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळायला हवा, याच विचाराने आम्ही नेहमी कार्यरत असतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा ऊसदर देण्यास क्रांती कारखाना कटिबद्ध असल्याने यंदाच्या गळीत हंगामाकरिता सदर ऊसदर आम्ही जाहीर करत आहोत.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबत झालेल्या बैठकीत कारखानदारांनी दर जाहीर करण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत घेतली होती. या कालावधीत दालमिया शुगरने ३ हजार ५३७ व सोनहिरा कारखान्याने क्रांती प्रमाणेच ३ हजार ५०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. अन्य कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केलेला नाही. कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिकचे शंभर रुपये दर जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. अन्य कारखान्यांनी दर जाहीर केला नसल्याने आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे खराडे व राजोबा यांनी सांगितले. सोनहिरा कारखान्याची एफआरपी ३ हजार ४६४ रुपये असताना केवळ अतिरिक्त ३६ रुपये प्रतिटन देण्याची तयारी दर्शवली आहे. हे आम्हाला मान्य नाही असेही त्यांनी सांगितले. मागणीप्रमाणे दर जाहीर केला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.