कराड : कृष्णाकाठच्या राजकारणात सत्ताविभागणीवरून मोहिते- भोसले कुटुंबातील संघर्ष चार दशकांनंतरही धगधगत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक परंपरेला याखेपेस मोठे वेगळे वळण मिळाले. डॉ. इंद्रजित मोहिते यांचे पारंपरिक ‘रयत पॅनेल’ प्रभावहीनतेमुळे रिंगणाबाहेर पडल्याने ही निवडणूक आता थेट ‘दुरंगी’ होत आहे. सध्या लाभाच्या ठरलेल्या घडामोडींमुळे सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा बोलबाला आहे. तर, सभासदांची वेळोवेळची करिष्मा दाखवण्याची मानसिकताही विरोधकांकडून चर्चेत आणली गेली आहे.

कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे सत्ताधारी ‘सहकार पॅनेल’ आणि माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे ‘संस्थापक पॅनेल’ आता आमने- सामने उभे ठाकले असून, सातारा व सांगली जिल्ह्यातील पलूस,  कडेगाव,  वाळवा आणि शिराळा अशा एकूण पाच तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ५० हजार सभासदांवर प्रभाव सिद्ध करण्याचे मोठे आव्हान दोन्ही पॅनेलसमोर राहिले आहे.

सत्ताधाऱ्यांचा बोलबाला

‘भोसले- उंडाळकर गटातील मैत्री’, ‘मोहित्यांच्या ‘रयत संघर्ष मंचचे मतपरिवर्तन’ ‘प्रबळ नेत्यांची अनपेक्षित भूमिका’ आणि ‘नवी उदयास आलेली समीकरणे’ सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहेत.  तर माजीमंत्री जयंत पाटील, डॉ. विश्वजित कदम यांच्या भेटी सकारात्मक झाल्याचे सत्ताधारी भोसले गटाचे म्हणणे असल्याने ‘सहकार पॅनेल’मध्ये जोश भरला गेला आहे. मात्र, वाळवा, शिराळ्यातील नेत्यांची दरवेळप्रमाणे मौन बाळगण्याची नीती आणि ‘कृष्णा’च्या सभासदांची करिष्मा दाखवण्याची मानसिकताही विचारात घ्यावी लागणार आहे.

संस्थापक’साठी मोठे आव्हान

रयत संघर्ष मंचचे खंदे नेते मदनराव मोहिते यांनी थेट ‘सहकार पॅनेल’चा मफलर गळ्यात अडकवून भोसलेंच्या कामाला ‘अतुलनीय’ शेरा दिला आहे. दुसरीकडे, पारंपरिक राजकीय शत्रू असलेले ‘भोसले- उंडाळकर’ ‘महायुती’च्या माध्यमातून एकत्र आले आहेत. भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील- उंडाळकर या नेत्यांच्या या अनपेक्षित भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असला, तरी ही नवी मैत्री विरोधी ‘संस्थापक पॅनेल’साठी आव्हान ठरणार आहे.

राजकीय गणितांचा ‘उदय’

‘कराड दक्षिण’मधील राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल केवळ कारखान्याची सत्ता ठरवणार नसून, भविष्यातील राजकीय नेतृत्वाची दिशा निश्चित करेल. मदनराव मोहिते आणि पाठोपाठ डॉ. इंद्रजीत मोहिते या माजी अध्यक्षांच्या  भूमिकेचा थेट लाभ सत्ताधारी भोसले गटाच्या पारड्यात पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्ह्याचे कारभारी खासदार नितीन पाटील व मंत्री मकरंद पाटील यांच्या मध्यस्थीने आकारास आलेले ‘भोसले- उंडाळकर मैत्रीचे समीकरण’ सातारा जिल्हा बँक आणि आगामी निवडणुकांवर दूरगामी परिणाम करेल.