सांगली : ध्वजारोहण करून आजपासून सांगलीत कृष्णामाई महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने ऐतिहासिक आयर्विन पूलाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून कृष्णा काठी विविध मनोरंजनाचे खेळ आणि बचत गटाने तयार केलेल्या खाद्य पदार्थाची रेलचेल आहे. सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

महापालिका, कृष्णामाई उत्सव समिती व श्री गणपती पंचायतन यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून  १२ फेब्रुवारी अखेर कृष्णामाई उत्सव  साजरा केला जात आहे. या उत्सवाची सुरूवात आज कृष्णाकाठी ध्वजारोहण करून करण्यात आली. सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनोहर सारडा, महेंद्र चंडाळे उपस्थित होते. या निमित्ताने पाच दिवस कृष्णामाईची ओटी भरणे, प्रवचन, कीर्तन, वेदपठन, संत संमेलन भावगीत, भक्तीगीत गायन, निबंध व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी कृष्णामाईची आरती व एक हजार दिव्यांचे दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.कृष्णामाई उत्सवानिमित्त आयर्विन पूलाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून घाटावर भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. संपूर्ण घाट परिसर सुशोभित करण्यात आला असून काठावर खाद्य पदार्थ, मनोरंजनाचे खेळ आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader