स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने ‘नया भारत’ या शोमधून एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली होती. भोली सी सुरत या गाण्याच्या चालीवर त्याने थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी असं एक गाणं तयार करत एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. ज्यानंतर त्याच्याविरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं होतं. या प्रकरणाची सुनावणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर पार पडली. राजकीय व्यंगावरच्या कारवाईचा कुणाल कामराने निषेध केला आहे. तसंच राजकीय व्यंग करणं हा लोकाशाहीचा भाग आहे, त्यावर गदा आणणं चूक आहे हे समितीला ठणकावून सांगितलं. यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत कुणाल कामराने प्रताप सरनाईक यांना उत्तर दिलं आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले होते?
कुणाल कामरा जे काही बोलतात, त्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव नेमत समिती नेमली आहे. समिती समोर ते उत्तर देत आहेत. मात्र एकनाथ शिंदेंच्या विरोधात जर ते गाणं म्हणू लागले तर शिवसेना काय हे त्यांना अजून ठाऊक नाही. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा आधीही त्यांनी पाहिला आहे. आताही पाहायला मिळू शकतो असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. त्यावर कुणाल कामराने बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्राचं उदाहरण देत प्रताप सरनाईक आणि शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाला उत्तर दिलं आहे.
काय आहे कुणाल कामराची पोस्ट?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या विचारधारेचा दावा करतात, तो मूळ विचारांवर आणि टीकेवर आधारित आहे. मग आजच्या काळात कलाकारांना का गप्प केले जात आहे? असेही कुणाल कामराने म्हटले. यावेळी त्यांना देशद्रोही या शब्दाबद्दल विचारणा करण्यात आली होती. यावरही त्याने खुलासा केला. देशद्रोही हा शब्द मी माझे वैयक्तिक मत म्हणून वापरला होता. हा शब्द अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी, अगदी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनीही सार्वजनिक रॅलीमध्ये वापरला आहे. मग फक्त मलाच टार्गेट का केले जात आहे? असा सवाल कुणाल कामराने केला. विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र कुणाल कामराने स्पष्ट नकार दिला. मी माफी मागितली तर ते ऐक ढोंग ठरेल. जर मी माफी मागितली, तर भविष्यात कोणताही कलाकार सरकारवर टीका करायला घाबरेल. हे लोकशाहीसाठी घातक आहे. यामुळे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल आणि एक चुकीचा पायंडा पडेल, असे कुणाल कामराने म्हटलंय.
बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्राचा दाखला
कुणाल कामराने जी पोस्ट लिहिली आहे त्यात त्याने बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींविषयी काढलेल्या एका व्यंगचित्राचा दाखला दिला आहे. हे आयकॉनिक आहे असंही त्याने म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे एक महान व्यंगचित्रकार होते. त्यांनी हेच नाही अनेक राजकीय व्यंगचित्रं काढली आहेत. पण त्यांच्यावर कधीही अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असं म्हणत कुणाल कामराने प्रताप सरनाईकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?
कुणाल कामराच्या या पोस्टबाबत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्याची बाजू घेतली आहे, काहींनी त्याच्या पोस्टला विरोध दर्शवला आहे. एक युजर म्हणतो कुणाल तुझं काहीही चुकलेलं नाही तुझ्या मतावर तू ठाम राहा. तू ज्या प्रकारे निडरपणे लढा देतो आहेस ते आवडलं. दुसरा एक युजर म्हणतो तू आत्ताच्या सरकारवर टीका केली आहेस तशी कधी काँग्रेसवर केली आहेस का? त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत दाखवशील का? तिसरा युजर म्हणतो की बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती राज्याचा रिमोट कंट्रोल होता, तू दुसऱ्या पक्ष ज्याला नाचवतो असे कळसूत्री बाहुले आहेस. कुणाल तुझी पोस्ट शिवसैनिकांनी वाचली तर ते नाराज होतील असंही एका युजरने म्हटलं आहे. अशा प्रकारे त्याच्या पोस्टबाबत प्रतिक्रिया येत आहेत.
