मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रीक्षा’ या गाण्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याची विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षीवेळी कुणाल कामरा यांनी आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे ठामपणे सांगितले. हे गाणे हा आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा भाग असून त्यातून व्यंग मांडण्यात आल्याचे त्याने आपल्या साक्षीत स्पष्ट केले.

विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. बैठकीत हक्कभंग आणणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कामरा यांच्या साक्षी झाल्या. सुनावणीदरम्यान मराठीतून मांडण्यात आलेले मुद्दे कळावेत म्हणून कुणाल कामरा याने सोबत भाषांतरकारही आणला होता. त्यांनी मुद्दे समजावून सांगितल्यानंतरच कामरा मुद्द्याला उत्तर देत होता.

यावेळी प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण कोणतीही चूक केली नसल्याचे कामरा याने ठामपणे सांगितले. यावेळी कुणाल कामरा याला बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आले असता त्याने याला आपल्या वकिलामार्फत उत्तर देणार असल्याचे सांगितले. विधिमंडळाने पुढील निर्णयापूर्वी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी सुनावणीनंतर दिली

समितीने यापूर्वी सहा प्रकरणांवर निर्णय दिला असून एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. कमरा यांच्या वर्तनाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, सुनावणीदरम्यान ते पूर्णपणे नम्र होते. मराठीत विचारलेल्या प्रश्नांचे अचूक आकलन होण्यासाठी त्यांनी भाषांतरकाराची मदत घेतली.

आता समितीसमोर सादर केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेऊन कमरा यांचे कृत्य विशेषाधिकार भंगात मोडते की ते व्यावसायिक व्यंगात्मक अभिव्यक्तीचा भाग आहे, यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रसाद लाड म्हणाले.

दरम्यान कुणाल कामराने घातलेल्या टी-शर्टचीही चर्चा रंगली. त्याने साक्षीदरम्यान परिधान केलेल्या टीशर्टवर I am not bad, you just don’t like me असे लिहिले हाेते. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसाद लाड यांनी त्याच्या टीशर्टवर काय लिहलेय हे वाचलेले नाही. आपण सुनावणीसाठी आलो असल्याचे नमूद केले.

सुषमा अंधारे यांची सुनावणी आठवडाभराने

सुषमा अंधारे यांच्याविरोधातील हक्कभंगाप्रकरणी सुनावणी आठवडाभराने होणार आहे. त्या आजारी असल्याचे त्यांनी कळवले असून त्यांच्या सुनावणीची तारीख त्यानुसार ठरवली जाणार असल्याचे लाड यांनी सांगितले.