सांगली : कुपवाड परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात झाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषा मोहन केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांचे पती मोहन केसरेकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख (वय ५२) याला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नहर्ता शांती कॉलनीत शेजारी राहणाऱ्या शेख आणि केसरेकर कुटुंबीयांमध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरून यापूर्वीही वाद होत होते. शनिवारी सकाळी पुन्हा या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर संतप्त झालेल्या फरीद शेख याने घरातील हातोडा आणि चाकू घेऊन केसरेकर दाम्पत्यावर हल्ला केला.
आरोपीने मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला, तर मनिषा केसरेकर यांच्या पोटात चाकूने वार केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना मनिषा केसरेकर यांचा मृत्यू झाला. मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याचा शोध सुरू केला. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी फरीद शेख हा मिरज-सांगली मार्गावरील वानलेसवाडी येथील बंद पडलेल्या मैत्रेय बिल्डिंगजवळ थांबलेला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच आपण हा हल्ला केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
