अकोले – ’वाचन ही केवळ सवय नसून ती व्यक्तिमत्त्व घडविणारी संस्कृती आहे,’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘कुसुमाग्रज वाचन अभियाना’ची आज, शनिवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली.

वाचन संस्कृती रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल वेड कमी होऊन पुस्तकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. अकोले तालुक्यात ठिकठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सामूहिक वाचन व अभिवाचन करून या अभियानाची सुरुवात केली.

देवठाण येथील शाळेत कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ग्रंथदिंडीने झाली. पालखीत संविधानासह ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, गीता, रामायण, कुराण, बायबल, ग्रामगीता, बुद्धाचे साहित्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तसेच आज्ञापत्र असे विविध धार्मिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक ग्रंथ ठेवण्यात आले होते. वर्गखोलीत भरवलेल्या ग्रंथ-परिचय प्रदर्शनाने उद्घाटन प्रा. डॉ.विजय भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठी, हिंदी व इंग्रजीतील विख्यात लेखकांच्या साहित्यकृतींसह कथा, कादंबऱ्या, ललित लेखसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्रे, ऐतिहासिक, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, शिक्षण, छायाचित्रण व बालसाहित्य यांची प्रभावी मांडणी करण्यात आली होती. विविध भाषांतील शब्दकोश, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विज्ञान-तंत्रज्ञान कुमारकोष व विश्वकोशाचे खंड, हस्तलिखिते, नियतकालिके, दिवाळी अंक आणि वार्षिकांक यामुळे प्रदर्शन वैविध्यपूर्ण झाले.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यकृतींचा यात समावेश होता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांपासून ते ख्यातनाम छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांनी अवकाशातून टिपलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची छायाचित्रे असलेल्या पुस्तकापर्यंत विविध ज्ञानपर ग्रंथ येथे होते. विविध प्रेरणादायी चरित्रांसोबत ‘उचल्या’, ‘उपरा’ आणि ‘बलुतं’ यांसारखी गाजलेली आत्मचरित्रेही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

शाळेतील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचा परिचय करून देत साहित्यप्रकारांचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षण विस्ताराधिकारी अनिल गायकवाड, सेवानिवृत्त ग्रंथपाल दामोदर बोडके, माजी मुख्याध्यापक रामदास सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. अशोक काळे, आबा बोडके, सचिन बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक मारुती बांगर यांनी आभार मानले. डोंगराळ व दुर्गम भागात वसलेल्या मांडेवाडी शाळेत गटविकास अधिकारी अमर माने यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.