Ladki Bahin Yojana April installment status and latest update on money transfer : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एप्रिल आणि मे २०२६ महिन्याचे अनुदान कधी मिळणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. मे महिन्याचे पहिले दहा दिवस संपत आले तरीही दोन्ही महिन्याचे अनुदान प्राप्त न झाल्याने अनेक पात्र महिलांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, १४ मे पासून डीबीटीद्वारे सरकारने पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिलांना पैसे क्रेटिड झाल्याचा मेसेज प्राप्त झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्याकरता राज्य सरकारने केवायसी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यापासून ई केवायसीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ई केवायसी करण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. तरीही या तांत्रिक अडचणी संपलेल्या नाहीत. मात्र, अशाही परिस्थिती ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी येण्यास सुरुवात झाली आहे.

लाडक्या बहीण योजनेचे किती महिन्याचे पैसे आले?

दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिना अशा दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा झाले आहेत. मार्च महिन्याचे पैसे १४ मे रोजी आले, तर एप्रिल महिन्याचे पैसे आज (१५ मे रोजी)प्राप्त झाले..

पैसे कसे तपासाल?

अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात, पण त्यांना मेसेज येत नाही. त्यामुळे अशा महिलांनी बँकेत जाऊन त्यांचं पासबूक अपडेट करून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला पैसे आले आहेत की नाही याची माहिती मिळेल. तसंच, अनेक बँकांचे मोबाईल अॅप असतात, त्यातील स्टेटमेंट पाहुनही तुम्हाला याची माहिती मिळू शकेल.

किती महिला पात्र ठरल्या?

महायुती सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी ठरलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली. त्यातील पात्र अपात्र बहिणींची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आता फक्त १ कोटी ७७ लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. अंतिम पडताळणी नंतर ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. सरकारचे या योजनेवर महिन्याला आता २ हजार ६५५ कोटी खर्च होणार आहेत. यापूर्वी हा खर्च ३ हजार ६०० कोटी रुपये होता. सरकारचे वर्षाला यामुळे दहा हजार कोटी वाचणार आहेत.