मुंबई: ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर आपण सत्तेत आलो, त्यांच्याच विविध योजनांना सरकारने कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. तब्बल सात तास काम केल्यानंतर या लाडक्या बहिणींना फक्त 81 रुपये मजुरी मिळत आहे. आजवर प्रत्येक निवडणुकीत महायुतीला भरभरून मतांचे दान देणाऱ्या या लाडक्या बहिणी सध्या सरकारच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा उद्रेक होण्यापूर्वीच सरकारने सावध व्हावे असा धोक्याचा इशारा एका ज्येष्ठ मंत्र्याने मंत्रिमंडळ बैठकीत दिला.

राज्यमंत्रण मंडळाची साप्ताहिक बैठक काल सह्याद्री अतिथीगृहात पार पडली .यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने राज्यातील लाडक्या बहिणींची कैफियत मंत्रिमंडळासमोर मांडली. राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकारने गेल्या काही दिवसांपासून सवंग योजनांना कात्री लावण्याचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून अनेक महिलांना वगळले जात आहे. तसेच सरकारच्या अन्य योजनांपासूनही महिलांना वंचित ठेवले जात असल्याने महिलावर्गात सरकारबद्दल नाराजी पसरु लागल्याची गंभीर बाब एका ज्येष्ठ मंत्र्यांने मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणली.

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे सरकार सत्तेवर आले. या योजनेत सुरुवातीस २ कोटी ४७ लाभार्थी लाडक्या बहिणींना पैसे दिले जात होते. मात्र अलिकडच्या काळात विविध आक्षेप घेत ९० लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. अशाच प्रकारे आनंदाचा शिधा बंद करण्यात आला असून दिवाळीसारख्या सणाला केरोसिन मिळत नसल्याच्या तक्रारी महिला करीत आहेत. सरकारकडून स्वस्त दरात देण्यात येणाऱ्या १४ जीवनावष्यक वस्तूंचाही पुरवठा होत नसून शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार योजनेममध्ये तर महिलांची सर्वाधिक फसवणूक आणि पिळवणूक होत असून शालेय पोषण आहार बनविण्यासाठी सात तास काम करणाऱ्या महिलांना फक्त ८१ रुपये मेहनताना मिळतो. त्या भरीव वाढ करण्याची माहिलांची मागणी असून काही महिला संघटनांच्या शिष्टमंडळाने ही कैफियत आपल्याकडे मांडल्याची बाब या ज्येष्ठ मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या निदर्शनात आणताना महिलांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व मंत्री आपापल्या मतदार संघात दुष्काळग्रस्तांच्या घरी जाऊन, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मराठवाड्यातील धाराशिव जिल्हयात फक्त ५.७ टक्के जलसाठा शिल्लक असून अकोला जिल्हयातही काहींशी अशीच गंभीर स्थिती असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्तांना पाच हजार रुपये अग्रीम देण्याच्या योजनेंतर्गत आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३ हजार ६७३ कोटी रुपये जमा करण्यात आले असून येत्या दोन दिवसात उर्वरित सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज आणखी ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ४ हजार ७६७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेंर्गत २१ लाख शेतकऱ्यांना १९ हजार कोटींच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीनंतर यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शहरात नव्हे तर दुष्काळी भागात दुष्काळग्र्स्तांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मिळून घेतला त्यानुसार मंत्री आपल्या भागात दिवाळी साजरी करणार आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले.