अलिबाग- लाडकी बहिण योजनेबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचे अपडेट दिले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास आजपासून सुरु होणार आहे.

फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पुढील दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रक्रीया महिला व बाल विकास विभागाने सुरु केली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, ज्या लाभार्थी महिलांची ई केवायसी प्रक्रीया पूर्ण झालेली नाही, त्यांनी ३१ मार्च पूर्वी ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहनही तटकरे यांनी केले आहे.   

रायगड जिल्ह्यात २२ हजार महिलांची ई केवायसी प्रक्रीया प्रलंबित

लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ६३ हजार ७८२ महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणांस्तव ती प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे. सध्या २२ हजार ३७५ महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. याकरिता लाभार्थी महिलांना तात्काळ https://ladakibahin.maharashtra.gov.in, या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दि.३१ मार्च २०२६ पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन रायगडचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

तालुकानिहाय प्रलंबित ई-केवायसी प्रकरणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग- २ हजार ६३३, कर्जत-१ हजार ९६२, खालापूर- १ हजार ७७२, महाड- १ हजार ६५६, माणगाव- १ हजार ७९९, म्हसळा-८०८, मुरुड-७१३, पनवेल-५ हजार १४०, पेण-१ हजार ५३३, पोलादपूर- ४२७, रोहा-८४४, श्रीवर्धन- ७८७, सुधागड-पाली-४८९, उरण-१ हजार ३७६, तळा-४३६.

महाराष्ट्र शासनाची “लाडकी बहीण” योजना सन २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण, स्वावलंबन वाढविणे व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 

तसेच ई-केवायसी करताना अडचणी येत असल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेंतर्गत मिळणारा लाभ बंद होऊ शकतो, याची लाभार्थींनी नोंद घ्यावी असे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे. .