Ladki Bahin Yojana implementation : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना इ-केवायसी करण्याकरता मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता संपुष्टात आली असून या छाननी प्रक्रियेतून तब्बल ८० लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिली. त्यामुळे, अपात्र महिलांना आता या योजनेअंतर्गत देण्यात येणारा १५०० रुपयांचा सन्मान निधी दिला जाणार नाही. दरम्यान, यावरून आता विरोधी पक्षाने यावर टीका करायला सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याविरोधात टीका केली.

“लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले. निवडणुकीच्या काळात कसलीही खातरजमा न करता घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे वर्ष-दीड वर्षाने सरकारला या योजनेत ८० लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा ही मोठी अजब बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश आहे”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला.

“जनतेच्या कष्टातून निर्माण झालेला कर रुपी पैशांतून ही योजना चालविली जाते. थोडक्यात जनतेचा पैसा गेली वर्ष दीड वर्ष हे सरकार अपात्र लाभार्थ्यांना वाटत होते का असा प्रश्न उपस्थित होतो. ही संपूर्ण बाब मूळात या सरकारचे घोर अपयश उघड करणारी आहे. हे दिलेला शब्द पाळणारे सरकार नाही. केवळ निवडणुकीतील फायदा गृहित धरून त्यांनी महिलांना खोटे आमिष दाखविण्याचा उद्योग केला असे यावरुन स्पष्ट होते. तब्बल ऐंशी लाख महिलांना अपात्र घोषित करून या सरकारने राज्यातील महिलांचा विश्वासघात केला आहे”, असं म्हणत त्यांनी सरकारवर शाब्दिक चपराक लगावली आहे.

“हा ८० लाख हा आकडा छोटा नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीस ‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभ नियमितपणे मिळालेच पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. यासाठी त्यांना विशिष्ट मुदतीत केवायसी करण्याची आडकाठी असू नये. राज्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांना केवायसी करण्याची संधी कायम उपलब्ध करून द्या”, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी सरकारला केलं आहे.