Ladki Bahin Yojana June installment direct bank transfer : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वांकाक्षी योजना आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये सन्माननिधी दिला जातो. दरम्यान, या योजनेतून ९२ लाख महिला अपात्र ठरले असल्याचे काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते. त्यामुळे आगामी सन्माननिधीच्या वितरणात आपल्याला पैसे मिळतील की नाही अशी शंका प्रत्येक पात्र महिलेला सतावत होती. आज, १५ जुलै रोजी जून महिन्याचा सन्मान निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तुम्हीही पात्र महिला असाल, तर तुमचं खातं आताच तपासा.
९२ लाख महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ३८ टक्के लाभार्थींची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यव्यापी पडताळणीनंतर ही कार्यवाही करण्यात आली असून द इंडियन एक्स्प्रेसने पाहिलेल्या सरकारी नोंदींनुसार ही संख्या ९२ लाखांपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत राज्य सरकारने सुमारे ८० लाख नावे वगळल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात ही संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
राज्यातील एकूण ९.५ कोटी मतदारांपैकी महिला मतदारांची संख्या ४.६ कोटी इतकी आहे. त्यापैकी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील सुमारे २.४६ कोटी महिला लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला पात्र ठरल्या होत्या. सप्टेंबर २०२५मध्ये योजनेची पडताळणी सुरू झाली तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या २.४३ कोटी इतकी होती, ती सध्या १.५ कोटींपेक्षा अधिक आहे. यादरम्यान योजनेतून वगळण्यात आलेल्या ९२ लाख लाभार्थ्यांपैकी सुमारे २९ हजार पुरुषांनी मागील दोन वर्षांपासून या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. तसेच, योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतानाही सुमारे ८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.
जून महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात
दरम्यान, जून महिन्याचा सन्मान निधी बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून तुम्हालाही यासंदर्भात मेसेज आलेत हे तपासा. मेसेज आले नसतील तर तुमचं बँकेचं स्टेटमेंट तुम्ही अपडेट करून घेऊ शकता. जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही याची माहिती मिळू शकेल. जर तुमचे नाव पात्र यादीत असूनही पैसे आले नसतील, तर पुढील २ ते ३ दिवसांत ते जमा होतील.
