मुंबई: राज्यातील काही भागात पडणारा अवकाळी पाऊस, गारपीटाचे संकट, आणि मुसळधार पावसाची शक्यता या कारणांमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना बँकेत सादर कराव्या लागणाऱ्या ओळख पडताळणी प्रक्रिया (केवायसी) साठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी ही मुदत संपली आहे. आता ३० एप्रिल पर्यंत शिल्लक महिलांनी केवायसी कागदपत्र ई प्रणालीद्वारे सादर करावेत असे आवाहन, महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना केवायसी सादर करण्यासाठी शेवटची मुदत ३१ मार्च देण्यात आली होती. आतापर्यंत एक कोटी ९० लाख लाडक्या बहीणींनी केवायसीसाठी लागणारी कागदपत्र सादर केलेली आहेत. यातील एक कोटी ७५ लाख बहीणी पात्र ठरलेल्या आहेत. एकूण दोन कोटी ४७ लाख अर्जदार लाडक्या बहीणींपैकी ७२ लाख लाडक्या बहीणी आतापर्यंत अपात्र ठरलेल्या आहेत.
राज्यात काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाबरोबर पडणाऱ्या गारपीटांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काळात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशा नैर्सगिक आपत्ती काळात केवायसीसाठी लागणारी कागदपत्र सादर करण्यास लाडक्या बहीणींना उसंत मिळालेली नाही. त्यांनी केवायसी सादर करण्यास मुदतावढ देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुदतवाढीस संमती दिल्यानंतर तटकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
