Ladki Bahin Yojana May Month Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा अखेर संपली आहे. कारण, १५ जूनच्या सायंकाळपासून पात्र महिलांच्या खात्यात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित पैसे जमा केले होते. तर या महिन्यात सरकारने मे महिन्याचा निधी जमा केला आहे.

सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिलअखेर राज्यात एक कोटी ७७ लाख महिला पात्र लाभार्थी म्हणून निश्चित झाल्या आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी तब्बल अडीच कोटी अर्ज प्राप्त झाले होते. गेल्या दीड वर्षांपासून या अर्जांची विविध टप्प्यांमध्ये छाननी आणि पडताळणी सुरू होती. अर्जदारांचे उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची माहिती, शासकीय योजनांचा लाभ, आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी पुरावे आणि इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान शासनाकडून अनेक वेळा ई-केवायसी आणि कागदपत्र सादरीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, तांत्रिक अडचणी, आधार-बँक लिंकिंगमधील त्रुटी, मोबाईल क्रमांक बदल, अपूर्ण कागदपत्रे आणि ऑनलाइन प्रणालीतील अडथळ्यांमुळे लाखो महिलांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही.

लाडकी बहीण योजनेतून किती महिलांना अपात्र ठरवलं?

काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिले, तर अनेक महिलांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आल्या. शासनाने ३० एप्रिल ही अंतिम मुदत जाहीर करून त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे ७० लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले. काही महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले, तर काही अर्जांमध्ये चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज किंवा निकषांशी विसंगत माहिती समोर आली. शासनाच्या दृष्टीने ही मोठी छाननी प्रक्रिया मानली जात असल्यामुळे लाभार्थ्यांची खरी संख्या स्पष्ट झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचा आलेला मेसेज

मेसेज नाही आला तर काय कराल?

दरम्यान, एप्रिल आणि मार्च महिन्याचे पैसे मे महिन्यात जमा केल्यानंतर आता मे महिन्याचे पैसे जून महिन्यात प्राप्त झाले आहेत. १५ जूनपासून हा निधी वितरित करायला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने पैसे यायला सुरुवात झाली आहे. अद्याप काही जणांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही. त्यामुळे पात्र महिलांनी घाबरून न जाता थेट बँक स्टेटमेंट पाहावे. बँकेच्या अॅपमधून तुम्हाला हे स्टेटमेंट मिळेल किंवा प्रत्यक्षात बँकेत जाऊन पासबूक अपडेट करून घेतल्यावर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही याची माहिती मिळेल.