मुंबई: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत वेगाने कपात करण्यात आली. अडीच कोटींवरून ही संख्या १ कोटी ७५ लाखांपर्यंत खाली आली. अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सुमारे ८० लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारची ही वृत्ती गरज सरो वैद्य मरो अशी असल्याची जोरदार टीका केली. सरकारसह महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुका संपताच लाडक्या बहिणींची आठवण विसरणारे आणि स्वतःला दादा, भाऊ, भाई म्हणवणारे नेते आता कुठे गेले आहेत? असा संतप्त सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

योजना सुरू झाली तेव्हा केवायसीचे कोणतेही कडक निकष नव्हते, याचा फायदा घेऊन अनेक पुरुषांनीही या योजनेचा गैरकायदेशीर लाभ घेतल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रकारे लाटलेल्या पैशांबद्दल आता आदिती तटकरे उत्तर देणार का? असा सवाल त्यांनी केला. सध्या सरकारच्या भूमिकेमुळे ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी स्थिती निर्माण झाली असून, अर्थ मंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस आणि केवळ स्वतःचेच सोलो बॅनर्स लावण्यात व्यस्त असलेले एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंत्री आदिती तटकरे यांचे महिलांसाठी कोणतेही ठोस योगदान नसून त्या केवळ योजनेचे अपडेट्स देण्यापलीकडे काहीही करत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

विधानपरिषद म्हणजे ‘नातेवाईक पुनर्वसन योजना’

सध्या राज्यात विधानपरिषदेची निवडणूक सुरू नसून ती भाऊ पुनर्वसन योजना आणि’बहीण पुनर्वसन योजना बनली आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीसाठी, तर खासदार सुनील तटकरे आपल्या मुलाला जागा मिळवून देण्यासाठी धावपळ करत असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.

अशोक खरातचे काय झाले?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशोक खरात आता कुठे गेला आहे? काही जण त्याचे पाय चेपायला जात असल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या प्रशासनाकडून हातभट्टीच्या दारूवर केवळ चार दिवसांची दिखाऊ कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील भिमनगर, विश्रांतवाडी येथील 6 हातभट्ट्या आणि येरवाडा, लमान तांडा भागातील अवैध दारूचे धंदे कायमचे बंद होणार नाहीत. ही अवैध केंद्रे पुन्हा सुरू होणार नाहीत, याची गॅरंटी कोण घेणार? असा थेट सवाल करत त्यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.