Ladki Bahin Yojna E-KYC fraud: महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आमिषाला किंवा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

योजनेसाठी नव्याने नोंदणी बंद

लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ‘नवीन अर्ज करून देतो’ किंवा ‘योजना मिळवून देतो’ असे सांगणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले. अशा प्रकारे काही जण महिलांची दिशाभूल करून पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले.

३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

योजनेअंतर्गत आधीच नोंदणी केलेल्या लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांना स्वतःच्या मोबाईलद्वारे सहजपणे ई-केवायसी पूर्ण करता येते. तसेच, गरज असल्यास जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अधिकृत मार्गानेच ही प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन सरकारने केले आहे.

प्रशासनाने घेतली गंभीर दखल

ई-केवायसीच्या नावाखाली काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडत असल्याने प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारांची माहिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीच्या नावाखाली महिलांचा छळ होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यान प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

जळगावमध्ये नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जळगावमधील या घटनेवरुन सरकारवर जोरदार टीका केली. महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याची दोन प्रकरणे घडल्याचा उल्लेख करत त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. जळगाव शहरातील गोकूळ चव्हाण या संशयिताने लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरी भेट दिली. आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देण्याच्या बदल्यात तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे.