महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून त्या नियंत्रणात आणण्याची मुख्य जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे, त्या पोलीस दलातील महिलाही सुरक्षित नसल्याची बाब पुढे आली आहे. आर्थिक देवाणघेवाणीची कुरापत काढून पोलीस कर्मचाऱ्याने प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयात हा प्रकार घडला.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण पोलीस ठाण्यात नेमणुकीला असणाऱ्या रामराव ननसिंग शेरे याने आडगावस्थित पोलीस मुख्यालयात येऊन नीतू बाबूसिंग राठोड (२२) या शिकाऊ महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे पैशांबाबत विचारणा करून वाद घातला. या वेळी उपरोक्त आर्थिक देवाणघेवाणीशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगितल्यानंतर संबंधिताने मारहाण केल्याचे राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे. जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाणीच्या या घटनेमुळे खुद्द या दलात महिला सुरक्षित नसल्याची बाब पुढे आली आहे.