Laxman Mane interview: “ज्येष्ठ नेते शरद पवार जातीयवादी नाहीत आणि होऊही शकत नाहीत”, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ लेखक लक्ष्मण माने यांनी मांडले. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांमध्ये सामाजिक भान, कृतीशीलता आणि संवेदनशीलता पाहायला मिळते, सध्याच्या राजकारणात असा नेता उरला नसल्याचेही माने म्हणाले. शरद पवारांच्या घरातील संस्कार सेक्युलर असल्याचे मत ‘उपरा’कार माने यांनी पाटीलकी या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मांडले.

वैयक्तिक संबंध, मैत्री, राजकारण आणि समाजकारणावर मत

“वैयक्तिक संबंध, मैत्री, राजकारण आणि समाजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत. या वेगळ्या गोष्टी आहेत हे आम्हाला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, ते जसं पवारांना सांगितलं तसंच मला ते देखील सांगितलं. पवारांना अधिककाळ सहवास लाभला मला कमी सहवास लाभला पण, आम्ही दोघेही यशवंतरावांचे शिष्य आहोत”, असे शरद पवारांशी असलेले ऋणानुबंध आणि भटक्या विमुक्तांची चळवळ आणि नेते याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लक्ष्मण माने म्हणाले.

शरद पवार जातीयवादी नाहीत – लक्ष्मण माने

“पवार जे राजकारण करतात ‘ते’ करतात, त्यांना ज्यावेळी राजकारणात मदत लागते तेव्हा मी करतो, आणि मला ज्यावेळी गरज पडते तेव्हा समाजकारणात ते मला मदत करतात. जात नावाची गोष्ट ते राजकाराणाच्या पलिकडे डोक्यातच ठेवत नाहीत, म्हणून शरद पवार हे व्यक्ती इतरांपेक्षा वेगळे ठरतात. तिकीट वाटप किंवा इतर सत्ता राजकारण ते करत असतील, पण कोणाची जात पाहून ते व्यवहार करतील हे अशक्य आहे. शरद पवार जातीयवादी नाहीत, होऊ पण शकत नाहीत, हे मला माझा ४०-५० वर्षाचा अनुभव सांगतो. त्यांनी ठरवलं तरी ते जातीयवादी होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या घरातील संस्कार सेक्युलर आहेत. त्यामुळे अजित पवार गेले (भाजपाबरोबर सत्तेत) पण, ते गेले नाहीत”, असे मत लक्ष्मण माने यांनी मांडले.

विचारसरणी, पिंड वेगळा असल्याचे मत

“या वयातही ते आज तिथंच आहेत, तिकडं गेले तर काहीतरी होतील की किंवा मुलीला काहीतरी करतील, पण ते नाही जाणार, त्यांचा पिंड वेगळा आहे. विचारसरणी वेगळी आहे. अजित पवारांना देखील त्यांना खूप समजावून सांगितले, आपण काँग्रेसच्या विचाराचे आहोत सांगितले”, असे माने पुढे म्हणाले. “शरद पवार सेक्युलर आहेत”, असे लक्ष्मण माने म्हणाले. संकटाच्या काळातही शरद पवार कशा पद्धतीने सामाजिक भान कसे ठेवतात याचे उदाहरण देताना लक्ष्मण माने यांनी यावेळी किल्लारीच्या भूकंपाच्या वेळचा एक प्रसंग सांगितला.

सामाजिक भानाची आठवण

“किल्लारीच्या भूकंप झाला त्यावेळी प्रेतांच्या अंगावरील सोने, दागिने चोरी होण्याची शक्यता होती आणि लक्ष्मण माने त्यांच्या समाजातील लोकांना आवाहन करुन असा प्रकार घडू देणार नाहीत अशी शरद पवारांना खात्री होती. त्यामुळे पवारांनी बोलावून मला लक्ष ठेवण्याचा जबाबदारी सोपवली होती”, अशी आठवण माने यांनी सांगितले. यानंतर (भटक्या) समजातील लोकांची बैठक घेऊन पवारांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला असे माने यांनी सांगितले. भूकंपात भटक्या समाजातील लोकांना टाटांनी घरे बांधून देण्याचा प्रस्ताव शरद पवारांनी ठेवला आणि आजही ती घरं व्यवस्थित आहेत. शिवाय त्यांच्या उपजीविकेसाठी देखील मोठं काम पवारांनी केल्याचे माने सांगतात. “असे सामाजिक भान असलेला नेता आता राजकारणात नसल्याचे सांगत माने यांनी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यानंतर एक मोठा शून्य”, असे मत मांडले.