रत्नागिरी : लोटे (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीभोवतीचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असून, कंपनीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या उत्पादनामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तरीही स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्यातील शंका कायम असल्याचे चित्र आहे.

कंपनीचे व्यवस्थापक राजेश नाईक, दिपक पाटील आणि उदय वैश्यपायन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, लोटे येथे तयार होणारे ‘फिपास’ उत्पादन पूर्णपणे सुरक्षित असून, त्याच्या निर्मिती व विघटन प्रक्रियेत आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते. तसेच, सर्व शासकीय परवानग्या मिळवूनच उत्पादन सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकल्पास सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. इटलीमध्ये बंद करण्यात आलेल्या ब्रिटेनी कंपनीचे यंत्रसामग्री लिलावातून भारतात आणून लोटे येथे बसवण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विविध आंदोलने, मोर्चे आणि आता उपोषण सुरू करण्यात आले असून, स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कंपनीकडून उत्पादन प्रक्रियेत सुरक्षिततेची हमी दिली जात असली, तरी विघटनासाठी तळोजा औद्योगिक वसाहतीकडे पाठवण्यात येणाऱ्या टँकरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टँकरला अपघात झाल्यास तात्काळ उपाययोजना नसल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा दुर्घटनेचा फटका स्थानिकांना बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, येथे तयार होणारा माल परदेशात निर्यात केला जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सुरू असलेल्या उपोषणामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.