रत्नागिरी : लोटे येथील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीविरोधातील वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शुक्रवारी अनपेक्षित वाद निर्माण झाला. पत्रकारांच्या निषेधानंतर अखेर बंदोबस्त हटविण्यात आला आणि त्यानंतरच परिषदेला सुरुवात झाली.

कंपनीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित या पत्रकार परिषदेत रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी तीन प्रवेशद्वारे उभारून पत्रकारांची कसून चौकशी केल्यानंतरच आत सोडले जात होते. या प्रकारामुळे उपस्थित पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“पोलीस बंदोबस्ताच्या छायेत पत्रकार परिषद घेणे योग्य नाही,” अशी भूमिका घेत पत्रकारांनी बंदोबस्त हटविण्याची मागणी लावून धरली. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच कंपनी व्यवस्थापनाने हस्तक्षेप करत माफी मागितली. “पोलीस बंदोबस्ताची मागणी कंपनीकडून करण्यात आलेली नाही,” असे स्पष्टीकरण देत व्यवस्थापनाने या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनावर खापर फोडले.

यानंतर काही वेळातच पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला. वातावरण निवळल्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यात आली आणि कंपनीने आपली भूमिका मांडली. मात्र कंपनी विरोधात होत असलेल्या आंदोलनाचा धसका व्यवस्थापनाने चांगलाच घेतला असल्याचे सांगितले जात आहे. लक्ष्मी ऑर्गेनिकविरोधातील आंदोलन तीव्र होत असतानाच या घटनेमुळे वादात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.