शेतजमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर आमचे पसे का देत नाही, आमच्या मुलाच्या नोकरीचे काय झाले, असा सवाल करीत किनवट तालुक्यातील अंबाडी येथील शेतकऱ्याने राज्याच्या कृषी विभागाचे संचालक सुरेश अंबुलगेकर यांना मारहाण केली. अंबुलगेकर यांनी या प्रकरणाची फिर्याद न देता तेथून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार किनवट कृषी विभागातील १० अधिकाऱ्यांनी मिळून अंबाडी शिवारात काही शेतकऱ्यांची १०० एकर जमीन विकत घेतली. यातील १० एकर जमीन विद्यमान कृषी संचालक अंबुलगेकर यांनी अंबाडीचे शेतकरी गंगारेड्डी विठ्ठल पतानीवार यांच्याकडून आपल्या मुलाच्या नावे करून घेतली. पतानीवार कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी लावतो, म्हणून पुन्हा तीन एकर जमीन मुलाच्या नावे करून घेतली. या व्यवहारानंतर ठरलेले पसेही दिले नाहीत. शिवाय नोकरीही लावली नाही. पशासाठी पतानीवार यांनी अंबुलगेकर यांच्या घराचे अनेकदा उंबरठे झिजवले. परंतु त्यांना कोणतीही दाद मिळाली नाही.
किनवट येथे शुक्रवारी मन्नेरवारलू समाजाची बठक झाली. या बठकीला अनुपस्थित राहणाऱ्या अंबुलगेकर यांनी स्वतचे अस्तित्व दाखवण्यासाठी आपल्या समर्थकांसह पुन्हा बठक घेतली. रामनगर भागातील सभागृहात ही बठक संपल्यानंतर या शेतकऱ्याने तुम्ही आमचे पसे का देत नाहीत, तसेच आमच्यावर अन्याय करता, स्वतला समाजाचे नेते म्हणवून घेता, तुम्ही पसे कधी देणार? अशी विचारणा केली. परंतु अंबुलगेकर यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास प्रारंभ केल्याने संतप्त झालेल्या पतानीवार कुटुंबीयांनी कृषी संचालकांना मारहाण केली. काही अन्य प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी केल्याने ही मारहाण थांबली. उघडपणे झालेल्या या मारहाणीने अंबुलगेकर किनवट पोलीस ठाण्यात तक्रार देतील, असे वाटत होते. पण त्यांनी तेथून पळ काढून थेट नांदेड गाठले.
वादग्रस्त अशी ओळख असलेल्या अंबुलगेकर यांच्या सौभाग्यवती जि.प.च्या माजी समाजकल्याण सभापती आहेत. विशेष म्हणजे अंबुलगेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत.