नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या विशेष कृती दलाच्या पथकावर बारीक लक्ष घेवून नक्षलवाद्यांनी मोठा झेलिया गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा शक्तीशाली सुरूंग स्फोट नियोजीत पध्दतीने घडवून आणला आणि त्यात तीन जवानांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष कृती दल जसे नक्षलवाद्यांच्या मार्गावर होते तसेच नक्षल दलम गेल्या कित्येक दिवसांपासून पोलीस दलाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे.
कुरखडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या गॅरापत्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठा झेलिया या गावात नक्षलवाद्यांचे वास्तव्य आहे. या गावालगतच्या जंगलात नक्षलवाद्यांची शिबिरे होतात. गेल्या कित्येक महिन्यांपासून नक्षलवादी या परिसरात असल्याची माहिती नक्षल विरोधी अभियान राबविणाऱ्या विशेष कृती दलाच्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर जवळपास ४० ते ५० जवानांचे पथक गेल्या काही दिवसांपासून मोठा झेलिया गावात दाखल झाले होते. या पथकाने मुक्कामासाठी झेलिया येथील जिल्हा परिषद शाळेची निवड केली आणि तिथेच त्यांची गफलत झाली. कारण, जवानांचे पथक शाळेत मुक्कामाला येताच नक्षलवाद्यांनी हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.
जवानांचा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचा दिनक्रम टिपण्यात आला. या शाळेत चार खोल्या असून संरक्षण िभंत सुध्दा आहे. पोलिस जवान सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायचे आणि स्वयंपाकसुध्दा तिथेच करायचे. त्यानंतर नक्षलवाद्यांचा शोध घेत जंगल पिंजून काढायचे. त्यानंतर रात्री उशिरा शाळेत येऊन दोन खोल्यांमध्ये पंख्याच्या अगदी खाली येवून झोपायचे. ही सर्व माहिती नक्षलवाद्यांनी मिळविली होती. दोन दिवसांपूर्वी जवान जंगलात निघून गेल्यानंतर काही नक्षलवादी शाळेत दाखल झाले. त्यांनी पोलिसांचा मुक्काम असलेल्या खोलीत पंख्याच्या अगदी खालची फरशी काढून तिथे जवळपास दहा किलो जिलेटीन व बारूद पेरून ठेवली. यानंतर ती फरशी सिमेंटने तशीच फिट करून ठेवली आणि जंगलात निघून गेले.
बुधवारी रात्री उशिरा ११.३० वाजता पोलीस पथक शाळेत आले. त्यापैकी चार ते पाच पोलीस खोलीत दाखल होताक्षणी नक्षलवाद्यांनी स्फोट केला. यात रविकुमार सुरमवार, सत्यवान कसनवार आणि ईशांत भुरे हे तीन जवान शहीद झाले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की शाळेच्या सर्व भिंती कोसळल्या. तसेच स्लॅबलासुध्दा भेगा पडल्या आहेत. दरम्यान या घटनेत नक्षल समर्थक गावकरी सुध्दा सहभागी असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत चार ते पाच फुटाचा खड्डा खोदून त्यात स्फोटके लपवून ठेवणे हे एकटय़ा दुकटय़ाचे काम नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेच्या वेळी किमान ४० ते ५० नक्षलवादी सहभागी झाले असावेत, असा अंदाज पोलीस दलाच्या वतीने वर्तविला जात आहे.    शहीद जवानांवर अंत्यसंस्कार
या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या रविकुमार सूरमवार व सत्यवान कसनवार यांच्या पार्थिवावर गडचिरोलीत, तर ईशांत भुरे याचे पार्थिवावर भंडारा जिल्हय़ातील त्याच्या स्व:गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कुटुंबीय व गावकरी मोठय़ा संख्येने हजर होते.