कोकण रेल्वे मार्गावर रविवारी मोठा अपघात होता होता टळला आहे. पेण रेल्वे स्थानकात दुष्मी रेल्वे गेट परिसरात भुस्खळन झाल्यामुळे वाहतूक काहीकाळासाठी ठप्प झाली होती. याचदरम्यान राजधानी एक्स्प्रेस या मार्गावरुन जात होती. मात्र गाडीच्या चालकाला आणि मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ट्रॅकवर पडलेला हा ढिगारा दिसला. चालक आणि पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधल्या समन्वयामुळे राजधानी एक्सप्रेस ढिगाऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर थांबवली गेली, त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला आहे. दरम्यान या मार्गावरची दरड आणि मातीचा ढिगारा बाजुला करण्यात यश आलं असून या मार्गावरहील वाहतूक सुरळीत झाली आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून राजधानी एक्स्प्रेस याच भागात अडकून होती.

याचसोबत रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचं धुमशान सुरुच आहे. २४ तासात सरासरी १५३ मिलीमिटर इतका पाऊस झाला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली, तरीही अद्याप धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून मौजे आपटे गावांमधील जुना कोळीवाडा, मुस्लिम मोहल्ला, जुनी पिंपळ आळी येथील नदीकाठच्या घरांमध्ये पाणी आले असून तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आपटा-खारपाडा रोडवर पाणी साचले असून वाहतूक बंद झाली आहे.

अवश्य वाचा – नागोठणे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा, प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर