मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपले आहे. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागोठणे शहराला पुराचा तडाखा बसला आहे. तर अंबेनळी घाटात दरड कोसळल्याने पोलादपूर- महाबळेश्वर दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्य़ात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश भागात सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे अंबेनळी घाटात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दरड कोसळली आहे. घाटात ज्या ठिकाणी रुंदीकरणासाठी डोंगर कापण्यात आला होता त्याच ठिकाणी ही दरड कोसळली आहे. सुरुवातीला दगडमातीचा काही भाग कोसळला होता, त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र थोडय़ा वेळाने मोठी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलादपूरहून एक पथक रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली़ त्यामुळे रात्री आठच्या सुमारास नागोठणे शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली़ पाली-वाकण दरम्यान वाहतूक बाधित झाली आहे. शहरातील मच्छी मार्केट, एसटी बसस्थानक, रिक्षा स्टॅण्ड, टेम्पो स्टॅण्ड आणि बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.