महाराष्ट्रासह मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे अशी सक्ती राज्य सरकारने केली आहे. कुठे जायचं आहे? किती पैसे होतील? अशी काही किमान प्रश्नांची उत्तरं तरी त्यांना देता आली पाहिजेत असा सरकारचा आग्रह आहे. महाराष्ट्रात राहायचं आणि पैसे कमावयाचे असतील तर इथली भाषा आली पाहिजे यासाठी सरकार आग्रही आहे. १५ ऑगस्टपर्यंत येथील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी आलं पाहिजे अशी मुदतही सरकारने दिली आहे. याबाबत मुंबईकर प्रवाशांचं म्हणणं नेमकं काय आहे? हे इंडियन एक्स्प्रेसने जाणून घेतलं आहे.

१० दिवसांमध्ये ४०० प्रवाशांशी साधण्यात आला संवाद

मुंबईतल्या जवळपास ४०० प्रवाशांशी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला. यामध्ये दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, अंधेरी, बोरिवली, विरार, पनवेल, वडाळा, ठाणे, कल्याण अशा ठिकाणच्या प्रवाशांचा समावेश आहे. मागील दहा दिवसांमध्ये इंडियन एक्स्प्रेसने या विविध ठिकाणी जाऊन अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येण्याबाबत मुंबईकरांना काय वाटतं ही मतं जाणून घेतली. जवळपास ६० टक्के प्रवाशांनी होय अमराठी लोकांना मराठी आलं पाहिजे असं सांगितलं आहे तर २५ टक्के प्रवाशांनी मराठी आलं पाहिजे या गोष्टीला पाठिंबा दिला आहे. तर बाकी १५ टक्के प्रवाशांनी मध्यम भूमिका घेतली आहे. भाषा येणं गरजेचं नाही, पण त्यांनी उद्धटपणा करु नये, भाडं नाकारु नये, इच्छित स्थळी आम्हाला सोडावं. योग्य पैसे आकारावेत अशा प्रवाशांच्या माफक अपेक्षा आहेत. नेमकं मुंबईकर प्रवाशांचं या सगळ्याबाबत म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊ.

Passengers take rickshaws outside Andheri station (east) in Mumbai. (Express photo by Sankhadeep Banerjee)
अंधेरी स्टेशनच्या बाहेर रिक्षा बसताना प्रवासी. (फोटो-संकल्पदीप बॅनर्जी, इंडियन एक्स्प्रेस)

मुंबईकर प्रवासी भाषेच्या सक्तीबाबत काय काय म्हणाले?

१) अनेक प्रवाशांचं म्हणणं हेच होतं की आम्हाला भाषेने तसा फार फरक पडत नाही. फक्त जो रिक्षा किंवा टॅक्सी चालक आहे त्याने आमच्याशी नीट बोलावं.

२) रिक्षा किंवा टॅक्सी चालक प्रामाणिक असला पाहिजे, त्याने योग्य ठिकाणी जाण्याचे योग्य भाडे आकारले पाहिजे.

३) रमेश यादव नावाच्या प्रवाशाने सांगितलं की माझ्यासह अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवास हवा असतो. तसंच जवळच्या अंतरावर जायला अनेकजण नाही म्हणतात ते नकोसंही होतं. भाषेच्या आग्रहापेक्षा हे महत्त्वाचं आहे.

४) युसुफ काँट्रॅक्टर या ५२ वर्षीय व्यावसियकाने सांगितलं की लोकांना चालकाला मराठी येतं का? यापेक्षा तो आपल्याला इच्छित स्थळी नीट नेईल का? याची काळजी जास्त असते. अनेक प्रवासी चालकाशी फार कमी बोलतात त्यामुळे भाषा हा मुद्दा महत्त्वाचा नाही.

५) वांद्रे या उपनगरातील राशी शेख या ३८ वर्षीय महिलेने सांगितलं की मुंबईत जे काम करायला येतात ते सगळेच इथे पोट भरतात. अशात लोकांवर कुठल्याही एका भाषेची सक्ती करायची म्हणजे थोडं अन्यायकारक आहे. कारण त्यावाचून फारसं काही अडत नाही.

ठाणे आणि दादरचे प्रवासी मराठी सक्तीसाठी आग्रही

ठाणे आणि दादर या दोन ठिकाणचे प्रवासी हे मराठी भाषेसाठी आग्रही दिसून आले. दादरमधल्या श्रीकांत सावंत यांनी सांगितलं मी एका कॉल सेंटरमध्ये काम करतो. आमची काही ही अपेक्षा नाही की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अस्खलित मराठी आलं पाहिजे. पण आम्हाला समजेल असं मराठी त्यांनी बोललं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात आणि मुंबईत राहाता आहात तर इथली भाषा आली पाहिजे. ठाण्यातही अनेक प्रवाशांनी होय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आली पाहिजे यासाठी आग्रह धरला.शिवाय या लोकांनी उद्धटपणा करु नये असंही मत ठाणेकरांनी मांडलं. सूर्यकांत पोखरे अंबरनाथला राहतात त्यांचं म्हणणं होतं की मराठी सक्ती ही खेडेगावांमध्ये हवी. कारण तिथे बऱ्याचदा एकच भाषा बोलली जाते. त्यांना हिंदी भाषा वगैरे कळत नाही. मुंबईचं तसं नाही. हिंदी, मराठी, इंग्रजी अशा तिन्ही भाषा या शहरात बोलल्या जातात. पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिक्षा-टॅक्सी चालकाने प्रवाशांना व्यवस्थित वागणूक देणं आणि जवळचं भाडं असेल तर ते न नाकारणं. शिवाय जर रिक्षा चालकांना मराठी आलं तर बरं होईल असंही मला वाटतं कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांना दुसरी भाषा येत नाही. कल्याण, डोंबिवली या ठिकाणी असंच चित्र आहे असं ते म्हणाले.

रिक्षा टॅक्सी चालकांचं काय म्हणणं आहे?

रजनीकांत तिवारी ५५ वर्षांचे आहेत. ते उत्तर प्रदेशातल्या जौनपूरहून मुंबईत आले आहेत. १९९० पासून ते मुंबईत रिक्षा चालवतात. ते म्हणाले की मला मराठी समजते. पण नीट बोलता येत नाही. मराठीत एखादा उच्चार चुकीचा झाला तर चूक व्हायला नको. आता मी मराठीत बोलायचा सराव हा माझ्या मुलीसह करतो आहे असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. शिव बाबू नावाचा चालक म्हणाला की मलाही मराठी येत नाही. पण मी युट्यूबवरच्या व्हिडीओवरुन भाषा शिकण्याचा प्रयत्न माझ्या परिने करतो आहे.

Mumbai auto taxi drivers Marathi language training | BJP Taxi Rickshaw Aghadi Cell initiative | Marathi school for drivers in Maharashtra | RTO licensing Marathi language mandate news
मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी भाजप टॅक्सी रिक्षा आघाडी सेलतर्फे ‘मराठी शाळा’ उपक्रम राबवण्यात येतो आहे.

इतर प्रवासी का काय म्हणाले?

हर्षिता शिरोडकर या ३० वर्षीय ठाणेकर महिलेने सांगितलं की महाराष्ट्रात येणार आहात, मुंबई, ठाण्यात राहणार आहात तर इथली भाषा त्यांना आलीच पाहिजे. आमचे आई वडील, आजी आजोबा हे खेड्यांमध्ये राहतात त्यांना मराठी भाषाच समजते. भाजीवाल्या बायका, फुल विक्रेते दादा सगळ्यांशी ते मराठीच बोलतात. मग रिक्षा-टॅक्सी वाल्यांनाही मराठी आलं तर बिघडलं कुठे? खारघर येथील महाविद्यालयात प्राध्यापिका असणाऱ्या सविता पोळ म्हणाल्या की महाराष्ट्रात, मुंबईत राहणाऱ्या अमराठी लोकांनी किमान इथली भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पनवेलमधल्या सुरज हांगे या विद्यार्थ्याने सांगितलं की रिक्षा किंवा टॅक्सी चालक हा जर आदरयुक्त बोलत असेल, प्रवाशांशी उद्धटपणा करत नसेल तर तो मराठी बोलतो आहे की हिंदी हे फार महत्त्वाचं नाही. अशाच प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.