रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील शांतीनगर परिसरात बुधवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव वेगाने जाणारी क्रेटा कार महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरच्या पाठीमागे जोरदार धडकली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, नवविवाहित महिलेसह चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील नागपाडा जंक्शन परिसरात राहणारे कुरेशी कुटुंब दोन दिवसांपूर्वी गोवा येथे सहलीसाठी गेले होते. सहल आटोपून बुधवारी पहाटे ते मुंबईकडे परतत असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला.

अपघातग्रस्त कारमध्ये अनस इरफान कुरेशी (वय ३१), त्यांची आई यास्मिन इरफान कुरेशी (वय ५४), महिनाभरापूर्वी विवाह झालेली पत्नी फिजा अनस कुरेशी (वय २७), महम्मद इरफान कुरेशी (वय१५) आणि चालक मुस्तफा अल्फाज काझी (वय २४) प्रवास करत होते. लांजा शांतीनगर परिसरात भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरच्या पाठीमागे जाऊन धडकली. धडकेनंतर कार डंपरला घासत पुढे जाऊन महामार्गाच्या दुभाजकावर आदळली.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत यास्मिन कुरेशी, फिजा कुरेशी, महम्मद इरफान कुरेशी आणि चालक मुस्तफा काझी यांचा जागीच मृत्यू झाला. अनस कुरेशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी नगरसेवक वैभव जोईल, युगंधर जोईल, वैभव गांधी, भास्कर तिखे, प्रताप जेधे आणि स्वरूप एकलुरे यांनी मदत केली. या भीषण अपघातात मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती. घटनेची माहिती मिळताच कुरेशी कुटुंबीय दुपारी लांजा येथे दाखल झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न…

या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे अनस इरफान कुरेशी आणि फिजा यांचा विवाह अवघ्या महिनाभरापूर्वी झाला होता. नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या या दाम्पत्यावर नियतीने क्रूर घाला घातला. सहलीच्या आनंदाचा प्रवास काही क्षणांतच शोकांतिकेत बदलला आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.