रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम मुदतीत पूर्ण करण्याच्या घाईत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे महामार्गाच्या निकृष्ट कामावरुन लक्षात येत आहे. लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे समोर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या भारावाच्या भिंतीवरील सिमेंट काँक्रिट प्लेट ढासळल्याचे निदर्शनास आले असून त्यावरील डांबरी रस्ताही एका ठिकाणी खचला आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेली अठरा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर लांजा शहरातील उड्डाणपूल व भारावाच्या भिंतीचे काम वेगाने सुरू करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.

उपशेट्येवाडी येथे भारावाच्या भिंतीवरील सिमेंट काँक्रिट प्लेट ढासळल्याची बाब ठेकेदार कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठिकाणी केवळ सिमेंट लावून ती बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ही तात्पुरती मलमपट्टी असून मूळ दोष लपविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याच ठिकाणी तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याची पाहणी केली असता रस्ता खचल्याचे तसेच मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे या कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भविष्यात येथे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.