रत्नागिरी : शिपोशी येथील एका तरुणीला मुस्लिम तरुणाने प्रेमसंबंधांच्या माध्यमातून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत शिपोशी पंचक्रोशीतील नागरिक आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सोमवारी लांजा पोलीस ठाण्यावर धडकले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच तरुणीच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात संबंधित मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीशी प्रेमसंबंधांचे नाटक करून तिला विविध प्रलोभने दाखवली, ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिच्या पालकांविषयी आणि हिंदू धर्माविषयी चुकीची माहिती देऊन तिची दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला.
तरुणी सध्या संबंधित तरुणाच्या दबावाखाली असल्याने तिची विधाने स्वतंत्र आणि निर्भय वातावरणात नोंदवावीत, अशी मागणी तिच्या पालकांनी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशातील अशा प्रकारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तरुणीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत नागरिकांमध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला.
या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेला तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच संबंधित तरुणाला मदत केल्याचा आरोप असलेल्या काही स्थानिक व्यक्तींचीही चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
या मागण्यांचे निवेदन लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना सादर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.
