रत्नागिरी : लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीत बुधवारी रात्री बिबट्याने थेट घरात घुसून केलेल्या हल्ल्यात ५२ वर्षीय व्यक्तीसह मदतीसाठी धावलेल्या १९ वर्षीय युवकाला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे सव्वानऊच्या सुमारास कुसुममळेवाडीतील एका घरात पाठीमागील बाजूने बिबट्या शिरला. घरातील सदस्यांना काही समजण्यापूर्वीच त्याने घरातील ५२ वर्षीय व्यक्तीवर झडप घालत हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घरात एकच गोंधळ उडाला.
हल्ल्यातील व्यक्तीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारा १९ वर्षीय युवक तातडीने मदतीला धावला. मात्र, आक्रमक झालेल्या बिबट्याने त्याच्यावरही हल्ला चढवला. या घटनेत दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बिबट्याने थेट वस्तीत आणि घरात घुसून हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याबाबतही हालचाली सुरू असल्याचे समजते.
गेल्या काही काळापासून ग्रामीण भागातील वस्त्यांजवळ बिबट्यांचा वावर वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बेनी बुद्रुकमधील या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
