रत्नागिरी : लांजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाकेड बौद्धवाडीजवळ महामार्गालगत सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या कामाच्या ठिकाणी शनिवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत एक वृद्ध व्यक्ती दरडीखाली गडला गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. रात्री प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक खचल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकेड घाट परिसरात महामार्गालगत पेट्रोल पंपाच्या उभारणीचे काम सुरू होते. कामगारांसाठी घटनास्थळी तात्पुरता निवारा उभारण्यात आला होता. दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एक वृद्ध व्यक्ती या निवाराच्या आडोशाला पावसापासून बचाव करण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी डोंगराचा काही भाग अचानक खचून मोठी दरड कोसळली.
या दरडीच्या ढिगाऱ्याखाली निवा-याजवळ बसलेली वृद्ध व्यक्ती गाडली गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. रात्री उशिरा हा ढीगारा बाजूला केला असता त्यात मृतावस्थेत हा अनोळखी व्यक्ती आढळून आला. या दुर्घटनेत घटनास्थळी काम करणारे जेद अतिकुल त्यागी (वय १८), सुवेल अयुब त्यागी (वय १९) आणि महंमद समीन साहवेज (वय २२) हे तिन्ही कामगार सुदैवाने सुरक्षित बचावले. त्यामुळे आणखी मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. बगळे यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जेसीबी यंत्रणा तसेच लांजा येथील आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला त्वरित पाचारण करण्यात आले. दरडीचा मोठा ढिगारा हटवून अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार प्रियंका ढोले यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वयाने मदत व बचावकार्य सुरू असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे परिसरात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने बचावकार्य अत्यंत सावधगिरीने करण्यात येत आहे.
या घटनेमुळे वाकेड घाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दरडीखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध सुरू करुन रात्री उशिरा एका ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तिचा मृतदेह हाती लागला. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात घाट परिसरात अनावश्यक थांबणे टाळण्याचे तसेच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
