scorecardresearch

पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर

गायक राहुल देशपांडे तसंच अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्रॉफ यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

“लतादीदी तिच्या गाण्यांच्या रूपाने आपल्यासोबत आहे. ती गेलेली नाही. गायनाचे पर्व संपले तरी हा युगांत नाही तर हे ‘लतायुग’ सुरू झाले आहे. हे लतायुग अनेक तरूणांना प्रेरणा देणार आहे”, अशी भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केली. यंदा पहिल्यांदाच ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून पुरस्काराचे पहिलेे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार असल्याची घोषणा उषा मंगेशकरांनी केली.

“नरेंद्र मोदी हे दीदीला बहीण मानायचे. जेव्हा आम्ही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची उभारणी केली, तेव्हा नरेंद्र मोदी हे उद्घाटनप्रसंगी आले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी दीदी असं म्हणाली होती की तिची इच्छा आहे की नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे. या तिच्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. लतादीदी ही सरस्वती होती आणि तिच्या मुखातून उमटलेले हे शब्द खरे ठरले. नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार द्यावा हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो. जगाच्या पाठीवर त्यांनी त्यांचे काम पोहोचवले आहे हे जगाने मान्य केले आहे”, अशी भावना हृदयनाथ मंगेशकर यांनी पुढे व्यक्त केली. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर लतादीदींनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले, त्यामुळे लतादीदींच्या कार्यकीर्दीलाही ८० वर्षे पूर्ण होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

येत्या २४ एप्रिलला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची ८० वी पुण्यतिथी साजरी होणार असून त्यानिमित्ताने मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची सोमवारी घोषणा करण्यात आली. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर उपस्थित होते. दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित या पुरस्कारांचे वितरण २४ एप्रिल रोजी षण्ङमुखानंद हॉल येथे संध्याकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे. उषा मंगेशकर अध्यक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षा असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. स्वरलतांजली या खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lata dinanath mangeshkar award pm narendra modi rahul deshpande aasha parekh vsk

ताज्या बातम्या