Maharashtra TET Exam 2026 Paper Leak Case: सुरक्षेचा प्रचंड मोठा गाजावाजा… ६ लाखांहून अधिक शिक्षक उमेदवारांचं भवितव्य… आणि तब्बल १ हजार २८ परीक्षा केंद्र! महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-TET 2026 ची गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा परिषदेनं प्रश्नपत्रिका छापण्याचे काम राज्याबाहेर, आग्रा येथील एका अत्यंत गुप्त छापखान्याला दिलं होतं. इतकं की, या छापखान्याचं नाव शिक्षणमंत्र्यांना, बड्या अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हतं. पण, सुरक्षेचा हा चक्रव्यूह भेदण्यासाठी आरोपींना कोणत्याही हायटेक तंत्रज्ञानाची गरज पडली नाही; तर केवळ एक ‘बूट’ आणि ‘८ हजार रुपये’ पुरेसे ठरले!

ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे शाखेने या आंतरराज्य पेपर लीक टोळीचा पर्दाफाश केला असून, या घोटाळ्याची धक्कादायक मोडस ऑपरेंडी आता समोर आली आहे.

प्रेसमधून पेपर कसा बाहेर आला?

१५ ते १७ जून दरम्यान आग्र्याच्या ‘महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रेसमध्ये जेव्हा प्रश्नपत्रिकांची छपाई सुरू होती, तेव्हा तिथल्याच कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली. प्रेसच्या सुरक्षेसाठी माजी सैनिकांची फौज तैनात होती. आत येणाऱ्या-जाणाऱ्यांची कडक अंगझडती घेतली जात होती. पण, या सुरक्षारक्षकांनी कर्मचाऱ्यांचे कपडे तपासले, मात्र बुटांकडे दुर्लक्ष केले. हीच चूक हेरून नरेशकुमार माहोरे ऊर्फ निक्की या कर्मचाऱ्याने प्रश्नपत्रिकेची घडी घातलेली पाने आपल्या बुटाच्या ‘इनसोल’ (तळव्याच्या गादीखाली) लपवली आणि तो सहज बाहेर पडला.

निक्कीनं सुरक्षेचं चक्रव्यूह कसं भेदलं?

TET परीक्षेचे पेपर १ आणि पेपर २ चे प्रत्येकी दोन सेट छापले गेले होते, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणताही एक सेट अचानक निवडता येईल. मात्र, या कर्मचाऱ्याने सलग तीन दिवस हीच पद्धत वापरून प्रश्नपत्रिकांचे चारही सेट बाहेर काढले आणि परीक्षा परिषदेची रणनीती पुरती मोडीत काढली.

६ लाख उमेदवारांचे भविष्य अवघ्या ८ हजारात विकले!

या संपूर्ण कटासाठी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अवघे ८,००० रुपये आणि भविष्यात एक भूखंड (Plot) देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या तपासात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, “सामान्य गुन्ह्यांमध्येही लाखो रुपयांची देवाणघेवाण होते. पण संपूर्ण राज्यातील ६ लाख शिक्षकांचे भविष्य ठरवणारा पेपर अवघ्या ८ हजार रुपयांसाठी विकला गेला, हे पाहून आम्हालाही धक्का बसला.”

मास्टरमाइंड बिजेंद्र गुप्ताचा ‘उलटा पॅटर्न’

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता (रा. भोपाळ, मूळ बिहार) सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजेंद्रचा पॅटर्न इतर पेपर लीक टोळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.

  • पारंपारिक पद्धत: सामान्यतः पेपर लीक करणारे एखाद्या विशिष्ट परीक्षेला टार्गेट करतात आणि तिथल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात.
  • बिजेंद्रचा पॅटर्न: त्याने थेट अशा छापखान्यांचा शोध घेतला, जिथे वेगवेगळ्या राज्यांचे गोपनीय पेपर छापले जातात. तिथल्या कर्मचाऱ्यांना दारू आणि पैशांचे आमिष दाखवून त्याने आपल्या जाळ्यात ओढले. छापखान्यात कोणताही पेपर आला, की तो थेट लीक करायचा.

ठाणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “बिजेंद्रला आधी माहीत नसायचे की कोणता पेपर येतोय. पण प्रेस मधील कर्मचाऱ्यांनी पेपर आणून दिला, की तो आपल्या जुन्या कोचिंग क्लासेसच्या नेटवर्कचा वापर करून ग्राहकांचा शोध घ्यायचा.”

CCTV बंद; सुरक्षेचा बोजवारा

तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक धक्कादायक बाब समजली. या अतिगोपनीय छापखान्यातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बंद होते. जर कॅमेरे सुरू असते, तर कर्मचाऱ्याची बुटात पेपर लपवतानाची कृत्यं कैद झाली असती.

८० हजारांना एक पेपर विकला

प्रेसमधून ८ हजार रुपयांत बाहेर पडलेला हा पेपर बिजेंद्र गुप्ताने आपल्या नेटवर्कद्वारे ८०,००० रुपयांना विकला. पुढे एजंट्सनी आपापले कमिशन जोडून हा आकडा आणखी वाढवला. विशेष म्हणजे, ‘नीट’ परीक्षेसारखा हा पेपर सोशल मीडियावर लीक न करता, केवळ फिजिकल कॉपी (हार्ड कॉपी) स्वरूपातच हस्तगत करण्यात आला होता.

भिवंडीत पोलिसांना काय टिप मिळाली?

२८ जून रोजी होणाऱ्या या परीक्षेचा पर्दाफाश परीक्षा होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी म्हणजेच २६ जून रोजी भिवंडीत झाला. ठाणे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त (DCP) पवन बनसोड यांना भिवंडीतून एक टिप मिळाली होती. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून छापा टाकला आणि शिक्षण विभागाकडून खात्री करून घेतली की हा मूळ पेपरच आहे.

यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली २० जणांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी बिहार, हरियाणा आणि आग्र्यातून आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे.

TET ची परीक्षा पद्धतच बदलण्याची सरकारवर वेळ

२०१७ पूर्वी महाराष्ट्र आपले पेपर राज्याबाहेर छापत असे. २०२१ मधील आरोग्य विभाग भरती घोटाळ्यानंतर खाजगी एजन्सीवरील विश्वास उडाला, म्हणून शासनाने पुन्हा जुन्या ‘राज्याबाहेरील गुप्त छपाई’ पद्धतीचा अवलंब केला. पण बिजेंद्र गुप्ताने याच सिस्टीमचा गैरफायदा घेतला.

आता या प्रकारानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं असून, परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. आगामी काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या धर्तीवर ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’ (Online Exam) किंवा डिजिटल पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवणे, अशा पर्यायांवर ही समिती विचार करत आहे.