चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे एसटी बसमध्ये झालेला स्फोट शोभेच्या दारूचा असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उदगीर- लातूर बसमध्ये नारायण ढाले हे आपल्या परिवारासह नळेगावनजीक शिरपूर येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी शोभेची दारू घेऊन जात होते. नळेगाव येथे एसटीमधून ढाले यांची आई व मुलगा हे खाली उतरले. ढाले यांच्या पत्नीच्या हातात या दारूची बॅग होती. गर्दीत बॅग एसटीच्या लोखंडी भागावर आदळल्याने दारू खाली पडली व मोठा स्फोट झाला. या स्फोटात २१ जण जखमी, तर ४ जण अत्यवस्थ आहेत. ढाले यांची पत्नी जयश्री ढालेही गंभीर जखमी झाली. पोलीस तपासात तिने याची कबुली दिली आहे.
ढाले यांनी स्फोटके नांदेड जिल्हय़ातील मुक्रमाबाद येथून खरेदी केली होती. तेथील दुकानदार शिवराज आडेप्पा आवडके व मुलगा कैलास आवडके(३२) व नारायण ढाले यांना अटक करण्यात आली आहे. ढाले कर्नाटकचा रहिवासी आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारच्या अतिरेकी संघटनेचा हात नाही. शिवराज आडेप्पा आवडके यांच्या दुकानातून ११०० ग्रॅम सल्फर, ७२४ ग्रॅम पोटॅशियम जप्त करण्यात आले. पत्रकार परिषदेस एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, जिल्हा पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, दीपाली घाडगे आदी उपस्थित होते.