निशांत भद्रेश्वर
लातूर : जिल्हा बँकेच्या राजकारणात काँग्रेसकडून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना ‘प्रेमा’ची वागणूक दिली. तर भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांना मात्र दूर ठेवले. यामुळे संभाजी पाटील चिडले असून ‘अभिमन्यू पवार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची काँग्रेसला जास्त भीती आहे, म्हणून त्यांचे लोक बिनविरोध निवडून दिले जात आहेत. देशमुख आम्हाला भीत नाहीत, म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत,’ असे ते तिरकसपणे म्हणाले.

  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे. बिनविरोध निवडी, उमेदवारी अर्ज माघारीसाठी दबाव आणि अपहरणाच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या उमेदवार रवी जाधव यांचे अपहरण करून दहशतीच्या वातावरणात उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा, आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. काँग्रेसकडून बाबासाहेब पाटील आणि अभिमन्यू पवार यांच्या समर्थकांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न झाले. अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांच्यासमोर विरोधक नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या बिनविरोध निवडून येतील. यावरून संभाजी पाटील निलंगेकर यांनी तिरकस टीका केली. 

  काँग्रेसने भाजपच्या उमेदवार  अपहरण करून दहशतीत  अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, या आरोपाचा पुनरुच्चार करुन संभाजी पाटील यांनी आपल्या टीकेचा रोख धीरज देशमुख यांच्याकडे वळवला. ते म्हणाले, १९९५ मध्ये संकुचित राजकारणामुळेच विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता. तेव्हा दिलीपराव देशमुख यांच्या स्वभावाचा फटका त्यांना बसला होता. आज पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख त्याच संकुचित वृत्तीने वागत आहे. अमित देशमुख मात्र विलासरावांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात आहेत. पण काका दिलीपराव आणि पुतणे धीरज यांची राजकीय दृष्टीही संकुचित आहे. यामुळे जुने राजकारण पुन्हा अवतरू शकते. ’  

 जिल्हा बँक निवडणुकीमध्ये संभाजी पाटील निलंगेकर गटातील पाच उमेदवार निवडणूक  लढत देत आहेत. कायदेशीर मार्गाने हा लढा सुरु राहील, असे ते म्हणाले. या पाच जणांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसकडून आक्षेप घेतले गेले आहेत.