लातूर –राज्य मंत्रिमंडळाच्या चार ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अकृषी कर रद्द करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्याचा शासन अध्यादेश अद्याप निघाला नाही आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून हा आदेश तातडीने काढण्याचे ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
लातूर महापालिकेने अकृषी कर भरला नाही म्हणून तहसीलदाराने यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल सील केले आहे. दोन कोटी ३६ लाख २८ हजार १२८ रुपये अकृषी कराचा भरणा लातूर मनपाने केला नाही. त्यामुळे सोमवार दिनांक २४ मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात तहसीलदारांनी ही कारवाई केली. या व्यापारी संकुलातील ३२ गाळे व दोन लॉजिंग सील करून वसुली मोहीमेची धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे अकृषी कर व गौण खनिज थकबाकीदारांची चिंता वाढली आहे.
ऐन गुढीपाडवा व ईदच्या तोंडावर दुकाने सिल केल्याने व्यापाऱ्यातून मात्र तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे .महापालिकेकडे वसुली मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे .पालिकेने ती त्वरित भरावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता मात्र पालिकेने लक्ष न दिल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले. आ.अमित देशमुख यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली व मुख्यमंत्र्यांनीही असे आदेश लवकर काढले जातील असे आश्वासन दिले आहे .प्रत्यक्षात मंगळवारीही यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील ज्या गाळ्यांचे सील केले आहे ते काढण्यात आले नव्हते.