प्रदीप नणंदकर

लातूर : विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर नगर परिषदेच्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाने लातूर शहरवासीयांना २४ तास नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशी घोषणा केली होती. त्याला दोन दशके उलटून गेली. २४ तास तर सोडा आठवडय़ातून एक वेळेसदेखील वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने लातूर शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
शरद पवारांच्या आगमनापूर्वीच वर्धेत मानापमान नाट्य; काँग्रेस नेत्यांना व्यासपीठावर स्थान नाही
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणातील पाणीसाठा संपून धरण कोरडेठाक पडल्याने २०१५-१६साली लातूर शहरवासीयांना रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. इतक्या दीर्घकाळ एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. त्यानंतर पाऊस झाला व धरणात पाणी आले. गेली पाच वर्षे धरणातील पाणीसाठय़ात अडचण नाही ,लातूर शहरवासीयांना मात्र धरणात पाणी असो अथवा नसो पाण्याची अडचण कायम आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अमृत योजनेतून शहरातील अंतर्गत नळाची पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी साठ कोटीपेक्षा अधिक निधी दिला होता. ते पैसे खर्च झाले मात्र अजूनही पाणीपुरवठय़ात कुठलीही सुधारणा नाही. अडीच वर्षांपूर्वी लातूर महापालिकेतील भाजपच्या सत्तेत फूट पाडत काँग्रेसने महापौरपदी आपला उमेदवार बसवला त्यानंतर शहरातील काही सोयी होतील अशी अपेक्षा होती. जानेवारी महिन्यामध्ये महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी धरणात पाणी असल्यामुळे आता आठवडय़ातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जाईल अशी घोषणा केली. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर तीन आठवडे असा पाणीपुरवठा कसाबसा केला गेला. मात्र त्यानंतर काँग्रेसच्याच मंडळींनी आठवडय़ातून दोन वेळा पाणीपुरवठा करणे गैरसोयीचे आहे असे आग्रही मत मांडल्याने तो पाणीपुरवठा थांबवण्यात आला. त्यानंतर शहरांतर्गत सुमारे पन्नास किलोमीटर पाइपलाइन नव्याने टाकण्यात आली. अनेक सुधारणा करण्यात आल्या या सुधारणांमुळे आठवडय़ातून दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र प्रशासन आळसावलेले आहे, त्यामुळे पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याची कबुली महापौरांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस लातुरात काँग्रेसच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी शहरवासीयांना पाणीपुरवठा करता येत नसेल तर महापौरांनी राजीनामा द्यावा व पालकमंत्र्यांनी आयुक्त बदलावा अशी मागणी केली. गेल्या दहा दिवसांपासून लातूर शहरात पाण्याचा नवाच प्रश्न निर्माण झाला आहे . शहरवासीयांना पाणी पुरवले जाते ते पिवळे येत आहे. त्यानंतर लोकांची ओरड सुरू झाली.  महापालिका प्रशासनाने पाइपलाइनमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे पाणी पिवळे येते मात्र हे पिण्यायोग्य आहे असा दावा केला. पाण्यात अतिशय घाण साचलेली असते, पाणी कपडय़ाने गाळून घेतले तरीही ते पिण्याचे धाडस कोणी करत नाही. भाजपच्या वतीने शहर वाचवा असा मोर्चा शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले असले, तरी ते शहरातील पाणी पीत नाहीत. ते बाहेरचे बाटलीबंद पाणी पितात, त्यामुळे सामान्य माणसांचे प्रश्न त्यांना कळणार नाहीत अशी टिप्पणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

पाणी शुद्ध नसल्यामुळे जारचे पाणी खरेदी करण्याकडे लोकांचा कल आणखीन वाढला आहे. पिण्यासाठी पन्नास टक्केपेक्षा अधिक लोक जारचे पाणी वापरतात. आता अशा पाण्याचे दरही गेल्या चार दिवसापासून वाढवण्यात आले आहेत. पाणी विक्री करणाऱ्यांशी सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे आहे का, त्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी मनपा अशुद्ध पाणीपुरवठा करते आहे का, असे सवालही लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. गेल्या दोन दशकांपासून पिण्याच्या पाण्याची लातूर शहरवासीयांची अडचण मात्र मागील पानावरून पुढे तशीच आहे.

अमित देशमुख यांचे आश्वासन हवेत

लातूरकरांना पिण्यासाठी आठवडय़ातून एक वेळा देखील शुद्ध पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित देशमुख यांनी लातूरवासीयांना दोन महिन्यांत उजनीचे पाणी पुरवले जाईल, शहरवासीयांनी नळाच्या तोटय़ा सज्ज ठेवा अन्यथा पाणी वाया जाईल असे सांगितले होते. अडीच वर्षे उलटली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. उजनीचे पाणी सोडा धनेगाव धरणाचे पाणीदेखील लातूरवासीयांना वेळेवर दिले जात नाही याबद्दल लातूरकर संतप्त आहेत.